Chandrapur News: मच्छीमारीसाठी गेलेल्या युवकाचा तलावात बुडून मृत्यू; चंद्रपूर जिल्ह्यातील घटना

Bhairav Diwase


चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातून एक अतिशय दुर्दैवी घटना समोर आली आहे, जिथे असोला-मेंढा येथील एका युवकाचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. पाथरी पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या असोला-मेंढा गावात ही हृदयद्रावक घटना गुरुवारी घडली. सचिन रमेश गेडाम नावाचा ३२ वर्षीय युवक दुपारच्या सुमारास असोला तळ्यात मच्छीमारीसाठी जाळे टाकण्याकरिता गेला होता. मात्र, तो बराच वेळ घरी परत न आल्याने ग्रामस्थांनी त्याचा शोध सुरू केला. या शोधादरम्यान, तळ्यात त्याची डोंगा उलटलेली अवस्थेत आढळून आली. डोंगा पलटी झाल्यामुळे सचिन पाण्यात बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आणि अखेरीस त्याचा मृतदेह तळ्यातून बाहेर काढण्यात आला.


या घटनेची माहिती मिळताच पाथरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला, पंचनामा करण्यात आला, आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. ठाणेदार सपोनी नितेश डोर्लीकर, सफौ सतीश गुरनुले, पोहवा खेलेश कोरे, तसेच पोलीस मेघश्याम गायकवाड, बळीराम बारेकर आणि प्रविण कोवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.


सचिन गेडाम यांच्या पश्चात आई-वडील, एक बहिण, एक भाऊ आणि अडीच वर्षांची मुलगी असा परिवार आहे. घरातील कर्ता आणि मोठा मुलगा दगावल्याने गेडाम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. असोला-मेंढा गावात या घटनेमुळे शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.