चंद्रपूर:- चंद्रपूर- पुणे, चंद्रपूर- मुंबई आणि चंद्रपूर- कोलकाता या महत्त्वाच्या गाड्या आठवड्यातील सर्व दिवस नियमित सुरू करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या साखळी उपोषणाला आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी भेट देऊन आपला ठाम पाठिंबा दर्शवला.
चंद्रपूर रेल्वे प्रवासी संघाने नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाच्या सोयीसाठी ही मागणी उचलून धरली आहे. याच अनुषंगाने, ६ डिसेंबरपासून सुरू झालेल्या साखळी उपोषण मंडपाला भेट देऊन, आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आंदोलकांची भेट घेतली. जिल्ह्यातील नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाशी निगडित असलेल्या या जिव्हाळ्याच्या मागण्यांना आपला ठाम पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी मुनगंटीवार यांनी बोलताना त्यांनी आश्वासन दिले की, चंद्रपूरकरांच्या सोयीसाठी या मागण्या सकारात्मकरीत्या मार्गी लागाव्यात, यासाठी केंद्र सरकारच्या रेल्वे विभागाकडे आवश्यक ती पुढील कार्यवाही तातडीने करण्यात येईल.

