Nashik Accident : सप्तशृंगगडावर भाविकांची ईनोव्हा कोसळली दरीत; एकाच कुटुंबातील ६ जण ठार

Bhairav Diwase
नाशिक:- सप्तशृंग गडावरुन दर्शन करुन परतत असताना पिकनिक पॉईंट परिसरात चालकाचे नियंत्रण सुटल्याने भाविकांची कार ६०० फूट दरीत कोसळून अपघात झाला. या भीषण अपघातात कारमधील एकाच कुटुंबातील ६ भाविक ठार झाले असून, मृत भाविक पिंपळगाव बसवंतमधील आहेत. हा अपघात रविवारी (दि.७) झाला. किर्ती पटेल (वय ५०, सर्व जण रा. पिंपळगाव बसवंत, ता. निफाड, जि.नाशिक), विठ्ठल पटेल (६५), लता पटेल (६०) पचन पटेल (६०), मनीबेन पटेल (७०) अशी अपघातात मृत्यू झालेल्या भाविकांची नावे आहेत. 


रविवार सुट्टीचा वार असल्याने सप्तशृंग गडावर भाविकांची सकाळपासूनच गर्दी होती. सदर कार (एमएच १५-बीएन ०५५५) ही नांदुरी सप्तशृःग गड १० किलो मीटरचे अंतर पार करत असताना पिकनिक पाॕईंट परिसरात चालकाचे नियंत्रण सुटले व काही समण्याच्या आत सदर कार खोल दरीत कोसळली. हा अपघात या मार्गावरुन जाणाऱ्या वाहनचालकांनी पाहिला. चालकांनी पोलिसांना अपघाताची माहिती दिली. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापनच्या पथकाला कार्यरत करण्यात आले. कारमधील मृतदेह काढण्यासाठी दोर व कपड्यांचा वापर करण्यात आला. दरीतील काटेरी झुडुपे व दाट झाडी यामुळे मृतदेह काढण्यासाठी पथकाला अथक परिश्रम करावे लागले. या ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाल्याने मोबाईलच्या प्रकाशात मदतकार्य पार पाडावे लागले.अपघाताची माहिती मिळताच सहा ते सात रुग्णवाहिका गडावर दाखल झाल्या. मात्र, अंधार व खंडीत वीजपुरवठा यामुळे वाहनांचे दिवे लावून पर्यायी व्यवस्था करण्यात आली.


सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाल्याची माहिती ग्रामपंचापयत सदस्य संदीप बेनके व राजेश गवळी यांनी देऊन सदर प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. अपघातानंर काहीकाळ वाहतूक बंद करण्यात आली होती. तर आपघाताची माहिती मिळताच अनेक वाहनचालकांनी परतीचा प्रवास केला. या घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव बसवंत येथील पटेल समाजाच्या कार्यकर्त्यांनी गडावर धाव घेतली.कळवण पोलीस उपअधिक्षक किरणकुमार सूर्यवंशी व सहाय्यक जिल्हाधिकारी नरेश हातनोरे गडावर दाखल झाले होते. ट्रॅक्टरच्या बॅटरीला वायर लावून प्रकाशाची व्यवस्था करण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत मृतदेह काढण्यासाठी प्रयत्न आपत्ती व्यवस्थापन पथक करत होते.