वरोरा:- पैशाच्या मागणीवरून आणि शेतीच्या वाटपाच्या वादातून संताप अनावर झाल्याने पोटच्या मुलानेच वडिलांची चाकूने भोसकून हत्या केली. ही धक्कादायक घटना मंगळवारी (दि.२८) रात्री वरोरा शहरातील चिरघर प्लॉट परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मृत व्यक्तीचे नाव नामदेव आनंद जीवतोडे (वय ५८) असे असून ते कुटुंबासह वास्तव्यास होते. त्यांचा मुलगा पीयूष उर्फ गोलू नामदेव जीवतोडे याच्यासोबत सतत वाद आणि शिवीगाळ होत असल्याची माहिती समोर आली आहे. अनेकदा कुटुंबीयांनी मध्यस्थी करत वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. होता. मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पुन्हा बाप-लेकात कडाक्याचे भांडण झाले. यावेळी रागाच्या भरात पीयूषने चाकूने हल्ला करत वडिलांना गंभीर जखमी केले. घटनेनंतर आईने तत्काळ पोलिसांना माहिती दिली.
पोलिस घटनास्थळी दाखल होताच जखमी नामदेव जीवतोडे यांना वरोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना चंद्रपूर येथे हलविण्यात येत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. वरोरा पोलिसांनी आरोपी पीयूषला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे वरोरा शहरात हळहळ व्यक्त होत आहे.


