Chandrapur News: तुकूम परिसरातील घटना: आत्महत्या की घातपात?

Bhairav Diwase
अर्पिताच्या आत्महत्याला येणार नवे वळणं; वडिलांचा घातपाताचा संशय!

चंद्रपूर:- चंद्रपूर शहरातील तुकूम परिसरातील एका भाड्याच्या खोलीत पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या २० वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना १७ एप्रिलला समोर आली होती. अर्पिता हरिदास वाकुलकर (वय २०, रा. मरेगाव, ता. मूल, जि. चंद्रपूर) असे या मृत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी मृत तरुणीच्या वडिलांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर करून, ही आत्महत्या नसून घातपात असण्याची शक्यता वर्तवली आहे.


काय आहे प्रकरण?

अर्पिता हरिदास वाकुलकर ही तरुणी खाकी वर्दी परिधान करून पोलीस दलात सेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगून चंद्रपूर येथील तुकूम परिसरातील वाघोबा चौकात खोली भाड्याने घेऊन पोलीस भरतीची पूर्वतयारी करत होती. मात्र, शुक्रवारी दि. १७ एप्रिल रोजी तिचा राहत्या खोलीत गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळल्याची माहिती तिच्या कुटुंबियांना मिळाली.


वडिलांचा गंभीर आरोप

मुलीच्या निधनानंतर तिच्या वडिलांनी, हरिदास वाकुलकर यांनी या घटनेवर संशय व्यक्त केला आहे. ही केवळ आत्महत्या नसून पूर्वनियोजित कट किंवा घातपात असावा, असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच, या घटनेमागे विशाल जाधव या मुलाचा हात असण्याची शक्यता असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.


न्यायाची मागणी

मयत तरुणीच्या वडिलांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात अर्ज सादर करून संशयित विशाल जाधव याची कसून व निःपक्षपाती चौकशी करण्याची मागणी केली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्याशी भेट घेऊन त्यांना याप्रकरणी सत्य बाहेर आणून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी आर्त हाक त्यांनी घातली आहे.