३३ लाखाची पाणी पुरवठा योजना, सायमारा वासियांची तहान भागवेल का?

Bhairav Diwase

सायमारा हे पाथरी ते सावली या मुख्य रस्त्यावर 2 किलोमीटर आतमध्ये असून विकासापासून वंचित.

Bhairav Diwase.    July 02, 2020

(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) मिथुन मेश्राम, पाथरी सावली

सावली:- सिंदेवाही तालुक्यातील ग्रामपंचायत तांबेगडी मेंढा अंतर्गत येणाऱ्या सायमारा या ठिकाणी पाण्याच्या टंचाईची समस्या लक्षात घेऊन भारत निर्माण मुख्यमंत्री पेयजल योजना या योजनेअंतर्गत सण २००८ - ०९ या वर्षांमध्ये  ३३ लक्ष रुपयाची योजना मंजूर करण्यात येऊन  कामाला सुरुवात करण्यात आली. परंतु हे कामच निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे या योजनेचे पिण्याचे पाणी अजूनपर्यंत सायमारा वासियांना मिळाले नसल्याने ही  पाणीपुरवठा योजना सायमारा वासीय जनतेची तहान भागवेल का?  असा प्रश्न सायमारा येथील जनतेकडून केल्या जात आहे. 

       सावली तालुक्यातील सायमारा हे आदिवासी बहुलभाग असून सिंदेवाही तालुक्यातील तांबेगडी मेंढा या ग्रामपंचायत अंतर्गत येते. सायमारा हे पाथरी ते सावली या मुख्य रस्त्यावर २ किलोमीटर आतमध्ये असून विकासापासून वंचित आहे. उन्हाळ्याच्या दिवसात पाणीटंचाई  ची समस्या लक्षात घेता गावातील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी  लागू नये म्हणून भारत निर्माण मुख्यमंत्री पेयजल योजनेतुन ३३ लक्ष रुपये खर्च करून पाण्याची टाकी निर्माण करण्यात आली व गावामध्ये पाईप लाईन टाकण्यात आली. परंतु टाकीचे बांधकाम करताच पाण्याची टाकी गळायला लागली. पाईप लाईन सुद्धा जास्त खोलवर नसल्यामुळे पाईप लाईन सुद्धा लिकेज झाली आणि पाणीपुरवठा योजना ठप्प झाली त्यामुळे सायमारा वासियांची पाण्याची समस्या तशीच राहिल्याने नाराजी झाली. या बाबीकडे अनेकदा गाववासीय नागरिकांनी सिंदेवाही येथील पाणीपुरवठा विभागाला सूचना केली असता वारंवार याकडे संबंधीत विभागाकडून दुर्लक्ष केल्या जात आहे. आजघडीला या योजनेला १२ वर्ष लोटले असताना या समस्येकडे अधिकारी यांचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सायमारा गावात पाण्याची टंचाई असल्याने नागरिक  तलावातील पाण्याचा पिण्याच्या पाण्यासाठी वापर करीत असून त्यांच्या आरोग्याच्या प्रश्न निर्माण झाला आहे. या समस्येकडे लक्ष देणारा सायमरा गाववासीयांचा  कुणीच वाली नाही का? असा प्रश्न जनतेकडून केल्या जात आहे. ही पाणीपुरवठा योजना सुरु होईल का ? की जैसे थे परिस्थिती राहून या गंभीर विषयाकडे नेहमी टाळाटाळ केल्या जाईल ? त्यामुळे या विषयाकडे जनतेचे लक्ष लागून आहे.


पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी गावपातळीवर समिती स्थापन करण्यात आली असता या समितीच्या देखरेखीखाली कंत्राटदाराला काम देण्यात आले होते परंतु काम सुरु असतानाच काम निकृष्ट दर्जाचे होत आहे असे समिती तथा अधिकारी यांना वारंवार सूचना केल्या असता संबंधीत अधिकारी यांनी दुर्लक्षितपणा केल्यामुळे या योजनेला १२ वर्ष पूर्ण होऊनही ही योजना ठप्प पडलेली आहे.

श्री कार्तिक माखिजा उपसरपंच तां. मेंढा