Sudhir mungantiwar : सुधीर मुनगंटीवारांची खंत: भाजपाने माझी शक्ती कमी केली

Bhairav Diwase
चंद्रपूर-गडचिरोलीला मंत्रिपद नाही, हीच जनतेची नाराजी!

चंद्रपूर:- राज्यातील २८८ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालांनी आज संपूर्ण राज्याचे राजकीय गणित बदलून टाकले आहे. विधानसभा निवडणुकीच्या धक्क्यातून सावरत काँग्रेसने विदर्भात अनपेक्षित मुसंडी मारली असून, भाजपच्या बालेकिल्ल्यांना भगदाड पाडले आहे. विशेषतः चंद्रपुरात विजय वडेट्टीवारांनी भाजपला अक्षरशः धूळ चारली असून, सत्ताधारी गोटात चिंतेचे वातावरण आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हयातील ११ पैकी ७ जागांवर काँग्रेसने विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे, गड मानल्या जाणाऱ्या भाजपला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला १ जागा मिळाली असून, एका जागेवर अपक्ष उमेदवाराने बाजी मारली आहे. 'चंद्रपूरचा टायगर अजूनही जिवंत आहे', अशी गर्जना करत वडेट्टीवारांनी या विजयाचा आनंद साजरा केला आहे.


मात्र, या पराभवापेक्षा जास्त चर्चा होत आहे ती भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रतिक्रियेची. आपल्याच पक्षाच्या कार्यपद्धतीवर त्यांनी थेट निशाणा साधला आहे. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने जनतेमध्ये प्रचंड रोष असल्याचे मुनगंटीवारांनी मान्य केले. 'मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व नाही, मग विकास कसा होणार?' असा सवाल करत त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे आपली नाराजी बोलून दाखवली आहे.


"एकूणच, या निकालांनी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचा आत्मविश्वास वाढवला असून, आगामी निवडणुकांसाठी भाजपसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. मुनगंटीवारांनी व्यक्त केलेली नाराजी भाजपच्या अंतर्गत कलहाला नवे वळण देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.