५ लाख ७५ हजारांची विक्री : उमेद व उत्पादक गट, ग्रामसंघाचा पुढाकार.
Bhairav Diwase. July 11, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- सध्या कोरोना महामारीने लाॅकडाऊन आहे. शेतक-यांच्या शेतीचे कामे सुरू आहेत. दरम्यान राज्यात आदर्श ग्राम म्हणून ओळख निर्माण करणा-या घाटकुळ येथील आधुनिक किसान धान उत्पादक गट व निर्मल महिला ग्रामसंघाने उमेद अभियानाच्या सहयोगाने ५ लाख ७५ हजार किमतीचे एक हजार बॅग खत शेतक-यांना गावातच उपलब्ध करुन देवून बांधावर पोहचवले.
राज्यात आदर्श ग्राम म्हणून ओळख असणा-या घाटकुळ येथील महिला बचत गटांनी विविध अभिनव उपक्रम राबवून जिल्हा, विदर्भ व राज्यस्तरावर पुरस्कार पटकावले आहे. उमेद अभियानांतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती तर्फे सामुहिक खरेदी प्रक्रिये अंतर्गत कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खते खरेदी करतांना दुकानांमध्ये गर्दी जमा होऊ नयेत. कोरोनाला वेळेत थांबविण्यासाठी व ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव होऊ नये या बाबींचा विचार करून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले, कृषी विकास अधिकारी शंकर किरवे, गटविकास अधिकारी धनंजय साळवे यांच्या मार्गदर्शनात या उपक्रमाची उमेद मार्फत कार्यवाही करण्यात आली.
आधुनिक किसान धान उत्पादक गट व निर्मल महिला ग्रामसंघ घाटकुळ यांच्या संयुक्त विद्यमाने सामुहिक खते खरेदी करण्यात आले. त्यामध्ये ५० शेतकरी यांचे १००० बॅग (५० टन) खताची ५ लाख ७५ हजार रुपये किमतीची एकत्रित खरेदी करण्यात आली. व शेतक-यांना गावातच बांधावर पोहचवून विक्री करण्यात आली. या उपक्रमाची सुरुवात पं.स.सभापती अल्काताई आत्राम, पं.स.सदस्य विनोद देशमुख, सरपंच प्रिती मेदाळे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आली.
उमेद अभियानामार्फत आतापर्यंत तालुक्यातील सहा गावांमध्ये सामुहिक खते खरेदीची प्रक्रिया राबविण्यात आली आहे. यावेळी पं.स.कृषी अधिकारी निलेश भोयर, विस्तार अधिकारी शेंडे, तालुका समन्वयक स्मिता आडे, उमेदचे तालुका अभियान व्यवस्थापक राजेश दुधे यांची उपस्थिती होती. या उपक्रमासाठी घाटकुळ येथील बचत गट सदस्य तसेच कृषी व उद्योग सखी मालन अशोक पाल, पुष्पा साईनाथ पावडे, प्रियदर्शनी दुधे, अल्का पाल, प्रतिमा दुधे व इतर सदस्यांनी पुढाकार घेतला. कोरोना काळात गावातच शेतक-यांच्या बांधावर खत बचत गट महिलांनी उपलब्ध करुन दिल्याने गावक-यांनी समाधान व्यक्त केले आहे.