33 लाखाची पाणीपुरवठा योजना सुरु होणार का? अधिकारी यांचे दुर्लक्ष.

Bhairav Diwase.    Aug 01, 2020
  

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:-  
सावली तालुक्यातील सायमारा येथील 33 लक्ष रुपयाची पाणीपुरवठा योजना अजूनही पूर्ण न झाल्याने सायमारा वासियांची तहान केव्हा भागवेल असा प्रश्न निर्माण झाला असून ग्रामविसीयांमध्ये संताप व्यक्त केल्या जात आहे.
        2008-09 या वित्त वर्षात भारत निर्माण मुख्यमंत्री पेयजल योजने अंतर्गत सावली तालुक्यातील सायमारा वासियांच्या पाण्याचा प्रश्न लक्षात घेऊन 33 लक्ष रुपयाची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. योजना मंजूर झाल्यानंतर  काम पूर्ण करण्यासाठी ग्रामपातळीवर एक समिती गठीत करण्यात आली. समितीच्या अध्यक्ष स्थानी श्री मनोहर पेंदाम यांची निवड करून काही सदस्य समितीमध्ये घेण्यात आले. समितीच्या मार्फतीने पाणीपुरवठा अधिकारी यांच्या देखरेखीखाली हे काम एका कंत्राटदारास देण्यात आले. कामाला सुरुवात झाली टाकीचे बांधकाम होताच काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे टाकी झिरपायला लागली. पाण्याच्या टाकी पर्यंत येणारी पाईप लाईन व गावात घरगुती नळ कनेक्शन घेण्यासाठी टाकलेली पाईप लाईन ही खोलवर अंतरावर टाकण्यात आली नाही तसेच पाईप सुद्धा हलक्या दर्जाचे वापर केल्यामुळे पाईप लाईन्स सुद्धा लिकेज झाली. सदर कामाची चौकशी न करता पाणीपुरवठा अभियंता यांनी देयके बनवून दिल्यामुळे रक्कम उचल करण्यात आली. सदर योजनेकडे गावातील सरपंच यांनी सुद्धा दुर्लक्ष केल्यामुळे या पाणीपुरवठा योजनेला तब्ब्ल 12 वर्ष लोटूनही ही योजना पूर्ण होऊ शकली नाही. समिती तथा अधिकारी यांच्या संगनमताने काम निकृष्ट दर्जाचे होऊनही कंत्राटदार यांना देयकाची रक्कम अदा करण्यात आली. ही योजना सुरळीत सुरु होऊन जनतेला पाणी मिळावं आणि पाण्याची समस्या मिटावी या करिता अनेकदा ग्रामस्थांनी पाणीपुरवठा अधिकारी यांच्याशी सम्पर्क करून काम पूर्ण करण्याची विनंती केली पण वारंवार अधिकारी यांनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे अधिकारी तथा समिती व कंत्राटदार यांचे साटेलोट असल्याची चर्चा ग्रामस्थ करीत आहेत. सावली तालुक्यातील बऱ्याच  पाणीपुरवठा योजना अपूर्ण असल्याची सुद्धा चर्चा तालुक्यातील जनता करीत आहे. या कडे अधिकारी लक्ष देऊन तहानलेल्या सायमारा वासियांची तहान भागवणार का?  असा सवाल जनतेकडून केल्या जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने