Top News

जिल्ह्यात सर्वदूर 'शाळा बंद पण शिक्षण सुरू' अभ्यासमाला अखंड सुरू.

शिक्षण विभागाचा स्तुत्य उपक्रम-आॅनलाईन, आॅफलाईन व स्वयंसेवकांतर्फे शिक्षण सुरू.
Bhairav Diwase.    Aug 03, 2020

(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- गत मार्च महिन्यापासून संपूर्ण जग कोरोनाच्या जागतिक महामारीने होरपळून निघालेले आहे.त्याला शिक्षणक्षेत्र देखिल अपवाद नाही. लाॅकडाऊनच्या गाईडलाइननुसार मागिल पाच महिन्यांपासून सर्व शैक्षणिक संस्था बंद आहेत.शिक्षणक्षेत्र अनुत्पादक असले तरी मनुष्यबळ विकासाच्या दृष्टीने शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.याचाच विचार करून शालेय शिक्षण विभाग तथा महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने अनेक तज्ञ शिक्षक, अधिकारी, पदाधिकारी, शिक्षण क्षेत्रातील तज्ञ यांच्याकडून मार्गदर्शक सूचना मागवून 'शाळा बंद पण शिक्षण सुरू अभ्यासमाला' सुरू करण्यात आली आहे. संपूर्ण लाॅकडाऊन कालावधीमध्ये आजपावेतो दरदिवशी एक याप्रमाणे १११ अभ्यासमाला शहरी,ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत आॅनलाईन पद्धतीने पोहचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.त्यात दिक्षा , जी- क्लास, stream, team अशा अनेक शैक्षणिक अॅप्स वापरून शिक्षण प्रक्रिया सुलभ व रंजक बनविण्याचा आटोकाट प्रयत्न चंद्रपूर जिल्ह्यात सर्वदूर सुरू आहे.
              आॅनलाईन शिक्षणाच्या मर्यादा असल्याने अनेक शिक्षक आॅफलाईन अथवा गावातीलच शिक्षणप्रेमी स्वयंसेवकांमार्फतीने विविध क्लृप्त्या वापरून ज्ञानगंगा विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य अविरत सुरू आहे. शिक्षकांच्या कोविड सेवेतील नियुक्तीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून अनेक स्वयंसेवी संस्था , शिक्षणप्रेमीस्वयंसेवक स्वप्रेरणेने समाजमंदिरात किंवा बुद्धविहारात , प्रार्थना मंदिरे अथवा घरोघरी देखिल प्रशासनाच्या दिशानिर्देशांचे पालन करून ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. 
          एकंदरीत आजघडीला कोरोना महामारीतदेखिल शिक्षकांच्या कल्पकतेमुळे व प्रशासकीय व्यवस्थेला सहकार्य करून विद्यार्थीहित जोपासण्याची भावना मनात ठेवून शिक्षणप्रक्रिया संथगतीने का होईना पण सुरू आहे. जिल्ह्यात टोकाच्या  तालुक्यांपर्यंत हा प्रयत्न सुरू आहे. त्यात अनेक टिव्ही चॅनलच्या शैक्षणिक मालिकांची देखिल मौलाची मदत शिक्षक व विद्यार्थ्यांना होतांना दिसत आहे. काही शाळांनी तर लाॅकडाऊन कालावधीमध्ये शाळांची रंगरंगोटी, शैक्षणिक साहित्य निर्मिती असे स्तुत्य उपक्रम देखील राबविले आहेत.
           सद्यस्थितीमध्ये आपण शाळा सुरू करू शकतो काय याचा आढावा गेल्या चार दिवसांपासून मुख्य कार्यकारी अधिकारी घेत आहेत. यासंदर्भात माध्यमिक शिक्षणाधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकारी तसेच जिल्ह्यातील शिक्षण तज्ज्ञांसोबतही मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी चर्चा केली आहे.
     राज्य शासनाने 31 ऑगस्टपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहे. मात्र या परिस्थितीत जिल्ह्यांमध्ये काही शाळांमध्ये अभिनव प्रयोग सुरू असून शिक्षक घरी जाऊन मुलांना शिकवत आहेत. काही ठिकाणी काही शिक्षकांनी मुलांना ऑनलाईन संवाद साधने सुद्धा सुरू केले आहे. अनेक शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे गट तयार केले आहेत. तर काही ठिकाणी गावांमध्ये फेरफटका मारून शिक्षक विद्यार्थ्यांची संवाद साधत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सध्या शाळा सुरू करणे शक्य नसल्याचे पुढे आले आहे.
    १५ ऑगस्टला शाळांकधी सुरू करता येईल याबाबत पुन्हा एकदा या संदर्भातील आढावा घेतला जाणार आहे. नियोजन तपासले जाणार आहे. त्यानंतरच जिल्ह्यातील शाळा कधी सुरू करायच्या याबाबतचा निर्णय घेतला जाईल. शासकीय आदेशानुसार शाळा सुरू करताना जिल्ह्यातील शैक्षणिक सुविधा, शाळांमधील कोरोना कॉरेन्टाइनची समस्या व कोरोनापासून विद्यार्थ्यांचा बचाव व्हावा यासाठीची उपाययोजना, यासाठी आणखी काही वेळ लागेल असे लक्षात आले आहे. त्यानुसार पुढील 15 तारखेनंतर या संदर्भातील आढावा घेऊनच निर्णय घेतला जाईल ,असेही मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी स्पष्ट केले आहे.
 
             जग जरी थांबल्यागत झालं तरी आपलं शिक्षणक्षेत्र कासवगतीने का होईना धावतो आहे याबाबत सर्व अधिकारी , शिक्षक व विद्यार्थी,पालक यांच्यामध्ये समाधान व्यक्त केल्या जात आहे हि शिक्षणक्षेत्रासाठी अभिनंदनपरच म्हणावं लागेल.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने