Top News

शेतकऱ्याच्या मुलाची गरुडझेप; एकाच आठवड्यात MPSC च्या ३ पदावर निवड.

Bhairav Diwase.    Aug 03, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मुलाने एकाच आठवड्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या तीन पदावर झेंडा रोवला. जुलै महिन्यात त्याची तीन पदावर निवड झाली.

मु.पो.तोहागाव ता.गोंडपिंपरी जि.चंद्रपूर येथील सुरेंद्र मनोहर बुटले या ध्येयवेड्या युवकाची एकाच आठवड्यात राज्य उत्पादन शुल्क उपनिरीक्षक- OBC - rank-2 रा, कर सहाय्यक (Tax Assistant) OBC- rank- 4 व मंत्रालय लिपिक - राज्यातून 2 रा अशा तीन पदांवरती परीक्षा उत्तीर्ण होऊन निवड झालेली आहे.

सुरेंद्र यांचे प्राथमिक शिक्षण हे तोहगावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये तर माध्यमिक शिक्षण हे किसान विद्यालय तोहगाव येथुन पुर्ण झाले आहे.

ज्युनियर कॉलेज चे शिक्षण चंद्रपूर येथील भवानजीभाई विद्यालयातून तर पुढे बी.ई ची पदवी चंद्रपूर येथील शासकीय महाविद्यालयातून पूर्ण झाले.

२०१५ पासून सुरेंद्र याने अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बागळुन पुण्यामधील प्रज्ञावर्धिनी स्पर्धा परीक्षा केंद्रामधून राज्य लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांचा अभ्यास सुरू केला.

अनेकवेळा अपयशाला सामोरे जाऊनही खचून न जाता जिद्द आणि चिकाटी यामुळे त्याने अधिक जोमाने अथकपरिश्रम घेतले व आज हे यश संपादन केलेले आहे.

खरंतर चंद्रपूर जिल्ह्यातील एका लहानश्या ग्रामिण भागातून येऊन विद्येच्या माहेरघरामध्ये त्याने बाळगलेली महत्वाकांक्षा आणि त्यातून मिळवलेलं हे यश अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल.

सुरेंद्र याची आई (शोभाताई बुटले) व वडील( मनोहर बुटले) हे अशिक्षित असून अल्पभूधारक शेतकरी आहेत.

कौटुंबिक परिस्थिती गरीब व हलाखीची असताना सुद्धा वडिलांनी मजुरी करून सुरेंद्र व त्याच्या मोठ्या भावाचे शिक्षण पूर्ण केले.

सुरेंद्र याचे मोठे बंधु नरेंद्र हे सुद्धा वनरक्षक आणि नंतर MSWC भांडारपाल या पदावरती चंद्रपूर येथे कार्यरत आहेत.

या यशाच्या शिखरावरती मागे वळून पाहताना आई व वडील यांनी जीवनामध्ये केलेला संघर्ष व गरीब परिस्थितीतही आम्हा भावंडांवरती केलेले संस्कार यामुळेच आम्ही इथपर्यंत यश संपादन करू शकल्याची भावना यावेळी सुरेंद्र याने व्यक्त केली.त्यामुळेच त्याने आपले हे यश आपल्या आई व वडिलांना दिलेली आहे.

तसेच सुरेंद्र यांनी आपले मोठे बंधू नरेंद्र , चंद्रप्रकाशजी बुटले (मुख्याध्यापक जि. प.) तसेच प्रज्ञावर्धिनी स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक सचिन हिसवणकर सर, शैक्षणीक प्रवासातील सर्व शिक्षक वृंद व आप्त मित्र परिवार यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे त्यांचे यावेळी आभार मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने