मनपा चे पदाधिकारी, आयुक्त व सेवा पुरविणाऱ्या व्यावसायिकांमधिल मधूर संबंधाची चौकशी करावी.
या आंदोलनाला श्रीराम युवा सेनेचा पाठिंबा:- जिल्हाध्यक्ष श्रीराम युवा सेना
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- जिल्ह्यामध्ये हजारोच्या संख्येने कोरोना रूग्णांची संख्या वाढत असताना शासकीय रुग्णालयात बेडच्या संख्येत वाढ झालेली नाही. उपचाराअभावी गोरगरीब सर्वसामान्य लोकांचे हाल होत आहेत. आजपर्यंत वेकोलीचे तयार असलेले जिल्ह्यातील चार मोठे दवाखाने ताब्यात घेण्याची तत्परता सुध्दा जिल्हा प्रशासनाने दाखविलेली नाही. शहर व जिल्ह्यातील अनेक लॉन व सभागृह खाली पडलेले आहेत. त्याचा वापर करण्याचा विचार कोणाच्या डोक्यात आला नाही. नागरिकांनी एखादा प्रस्ताव दिला की मात्र बॉम्बे नर्सिंग होम अॅक्ट तसेच इतर नियमांवर बोट ठेवण्याचे काम जिल्हा प्रशासन तसेच महानगरपालिका करीत असते.
मात्र चंद्रपुरातील खाजगी जम्बो कोविड हॉस्पिटलला परवानगी देताना मनपाने कमालीची तत्परता दाखवली. एका डॉक्टरने हस्तलिखित अर्ज दिला. अर्जावर तारीख नाही, मनपाचा आवक-जावक क्रमांक नाही. त्याच दिवशी मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. अविष्कार खंडाळे यांनी त्या अर्जावर मार्किंग केली आणि तातडीने जंबो कोविड हॉस्पिटल ला परवानगी देण्यात आली. अर्ज डॉक्टरांनी स्वतःच्या नावाने दिला आणि परवानगी त्यांच्या पत्नीच्या नावाने देण्यात आली. अशा प्रकारचे जम्बो हॉस्पिटल उघडण्यासाठी मनपाला रितसर प्रस्ताव देणे तसेच प्रस्तावासोबत डीपीआर म्हणजे डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट जोडणे सुध्दा आवश्यक आहे. या रिपोर्टमध्ये लहान-सहान एजन्सी यांच्यासोबत झालेल्या कराराची माहिती देण्यात आलेली नाही. डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ तसेच इतर साधन- सामुग्री कशाचीही सविस्तर माहिती नसताना व मनपाच्या आरोग्य विभागाने साधे जागेचे निरीक्षणही केलेले नसताना तातडीने कारवाई करून जम्बो कोविड हॉस्पिटलला परवानगी दिल्याने भविष्यात रुग्णाच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो. अशाच प्रकारे रामनगर मधिल सेंट मायकल जवळ दाट लोकवस्तीत असलेल्या एका इमारतीमध्ये भाजपचे पदाधिकारी असलेल्या डॉक्टरच्या खाजगी जम्बो कोविड रुग्णालयाला सुध्दा साध्या हस्तलिखित अर्जावर तातडीने परवानगी देण्यात आलेली आहे. मनपाने परवानगी देताना जी तत्परता दाखवली ती संशय निर्माण करणारी आहे. कोरोनाच्या आजाराचा बाजार मांडला जात आहे आणि या बाजारात मनपाचे भ्रष्ट अधिकारी, पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील मोठे नेते आपले दुकान मांडत असल्याच्या बातम्या प्रसिद्धी माध्यमांमध्ये येत आहेत. गोरगरीब सर्वसामान्य-रुग्णांचे, कोविड योध्द्यांचे कोरोना महामारी मध्ये उपचाराअभावी हाल होत असताना मनपाचे पदाधिकारी, अधिकारी व मोठे नेते यांची वागणूक पाहून वेदना होतात. या वेदना व्यक्त करण्यासाठी तसेच गोरगरीब सर्वसामान्य रुग्णांसाठी तातडीने मोठ्या प्रमाणात हॉस्पिटल सुरू करण्याच्या मागणीसाठी आज दिनांक २३ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत महानगरपालिका इमारतीसमोरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर बसून जनविकास सेनेचे अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख यांनी आत्मक्लेश आंदोलन केले. यावेळी जन विकास सेनेचे पदाधिकारी घनश्याम येरगुडे, देवराव हटवार, किशोर महाजन, निलेश पाझारे, दिनेश कंपू, इमदाद शेख, मनिषा बाबडे, मीनाताई कोंतंमवार, कविता अवथनकर, साईनाथ कोंतंमवार, अक्षय येरगुडे, आकाश लोडे, सतीश येसांबरे, अमोल घोडमारे, प्रफुल बैरम, नामदेव पिपरे, वैभव ऐनप्रड्डीवार, गीतेश शेंडे, प्रवीण मटाले उपस्थित होते.
-मनपा चे पदाधिकारी, आयुक्त व सेवा पुरविणाऱ्या व्यावसायिकांमधिल मधूर संबंधाची चौकशी करावी -
नागपूर रोडवरील जम्बो हॉस्पिटल साठी खाजगी डॉक्टरांनी ज्या कंपनीसोबत करार केला त्या गंगा-काशी इन्फ्रास्ट्रक्चर एलएलपी या कंपनीचे संतोष बोरुले हे संचालक आहेत. या कंपनीला कन्स्ट्रक्शन मध्ये तसेच हॉटेल व्यवसायात काम करण्याचा अनुभव आहे. वैद्यकीय सेवा पुरविण्याचा अनुभव नसताना कंपनीला जंबो कोविड हॉस्पिटल साठी परवानगी देण्यात आलेली आहे. सुरुवातीला चंद्रपूरातील क्वारंटाईन सेंटरवर ११५ रुपये थाळीप्रमाणे जेवण पुरविण्याचे काम स्थानीक कॅटरींग व्यावसायीक करत होते. अचानक त्यांचे काम बंद करून १२४ रुपये प्रति थाळी या दराने नागपुरातील एका कंत्राटदाराला काम देण्यात आले. या कंत्राटदाराचे संतोष बोरूले यांच्यासोबत मधुर संबंध आहेत. तसेच आयुक्त राजेश मोहिते यांचे सुध्दा बोरूले यांच्या सोबत ॠणानुबंध असल्याची चर्चा आहे.
शकुंतला फार्म चे मालक अमोल पत्तीवार आहेत. त्याचप्रमाणे लोटस हॉटेल येथे क्वारंटाईनची सुविधा होती. या हॉटेलचे मालक संदीप पोशट्टीवार आहेत. सेंट मायकल जवळ ज्या इमारतीत दुसरे खाजगी कोविड हॉस्पिटल सुरू होत आहे त्याचे मालक सुध्दा संदीप पोशट्टीवार आहेत.
मनपा पदाधिकारी-अधिकारी व व्यावसायिक यांनी साखळी तयार करून कोरोना आजाराचा बाजार मांडलेला आहे. याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी पप्पू देशमुख यांनी केली.
या आंदोलनाला श्रीराम युवा सेनेने पाठिंबा दिला आहे. असे युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष यांनी आधार न्यूज नेटवर्कची बोलताना सांगितले.