Top News

बाबरी विध्वंस केसमधील सर्व आरोपी निर्दोष मुक्तता.

न्यायाधीश म्हणाले; 'घटना पुर्वनियोजित नव्हती'.
Bhairav Diwase. Sep 30, 2020


भारत:- १९९२ मध्ये बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. लखनऊच्या विशेष सीबीआय न्यायालयाने आज निकाल दिला. बाबरी मशीदप्रकरणी निकाल येणार असल्याने संपूर्ण देशाचं निकालाकडे लक्ष लागलं होतं.

या प्रकरणात भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी आरोपी होते. सीबीआयचे विशेष न्यायाधीश एस के यादव यांनी १६ सप्टेंबरला सर्व आरोपींना निकालाच्या दिवशी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. आरोपींमध्ये उमा भारती, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, विनय कटियार, साध्वी ऋतंभरा यांचाही समावेश आहे.


या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने न्यायालयापुढे ३५१ साक्षीदार आणि सुमारे ६०० कागदपत्रं पुरावा म्हणून सादर केले होते.

४८ जणांविरोधात आरोप निश्चित करण्यात आले होते मात्र त्यापैकी १६ जण खटला सुरु असताना मरण पावले. १६ व्या शतकातील ही मशीद पाडण्यासाठी आरोपींनी कारस्थान रचले आणि कारसेवकांना मशीद पाडण्यासाठी फूस लावली असा सीबीआयचा युक्तिवाद होता.

दरम्यान न्यायालयात निकाल सुनावला जात असताना लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, कल्याण सिंह, सतीश प्रधान आणि महंत नृत्यगोपाल दास यांच्याव्यतिरिक्त सर्वजण उपस्थित होते. अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना प्रकृतीच्या कारणास्तव गैरहजर राहण्याची मुभा देण्यात आली. तर उमा भारती यांना करोनाची लागण झाली असून, कल्याण सिंह सध्या उपचार घेत आहेत. एकूण २६ आरोपी कोर्टात हजर होते. यामध्ये साध्वी ऋतंभरा, चंपत राय, विनय कटियार, ब्रिजमोहन शरण सिंग आणि इतर जणांचा समावेश होता.

उमा भारती सध्या उत्तराखंड येथील रुग्णालयात उपचार घेत असून भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी पत्र लिहिलं होतं. यामध्ये त्यांनी आपल्या दोषी ठरवण्यात आल्यास जामीनासाठी अर्ज करणार नाही असं सांगितलं होतं.

लालकृष्ण अडवाणी यांनी २४ जुलैला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून विशेष सीबीआय कोर्टात आपला जबाब नोंदवला होता. यावेळी त्यांना न्यायाधीशांकडून एकूण १०० प्रश्न विचारण्यात आले होते. त्याच्या एक दिवस आधी मुरली मनोहर जोशी यांचा जबाब नोंदवण्यात आला होता. दोघांनीही आपल्यावरील आरोप फेटाळून लावले होते.

बाबरी विध्वंस प्रकरणात आज ( 30 सप्टेंबर ) लखनऊ येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. तसेच घडलेली घटना ही पुर्वनियोजित नव्हती असं देखील न्यायाधीशांनी स्पष्ट केलं आहे . सेशन ट्रायल नंबर 344/1994, 423/2017 आणि 796/2019 सरकार विरूद्ध पवन कुमार पांडे आणि अन्य वरील प्रकरणात सर्व पक्षांची सुनावणी 16 सप्टेंबरला पूर्ण झाली होती. यानंतर सुरेंद्र कुमार यादव , पीठासीन अधिकारी , विशेष न्यायालय, अयोध्या प्रकरण , लखनऊ यांनी 30 सप्टेंबर 2020 ही निर्णय देण्यासाठी तारीख ठरवली होती. बाबरी विध्वंस प्रकरणात एकुण 49 आरोपी होते , ज्यापैकी सध्या 32 जण हयात आहेत आणि 17 जणांचे निधन झाले आहे. अखेर तब्बल 28 वर्षानंतर न्यायालयाकडून सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे.

बाबरी मशिद केसमध्ये 'हे' आहेत 32 आरोपी.

लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, कल्याण सिंह, उमा भारती, विनय कटियार, साध्वी ऋतंभरा, महंत नृत्य गोपाळ दास, डॉ. राम विलास वेदांती, चंपत राय, महंत धर्मदास, सतीश प्रधान, पवन कुमार पांडेय, लल्लू सिंह, प्रकाश शर्मा, विजय बहादुर सिंह, संतोष दुबे, गांधी यादव, रामजी गुप्ता, ब्रज भूषण शरण सिंह, कमलेश त्रिपाठी, रामचंद्र खत्री, जय भगवान गोयल, ओम प्रकाश पांडेय, अमर नाथ गोयल, जयभान सिंह पवैया, महाराज स्वामी साक्षी, विनय कुमार राय, नवीन भाई शुक्ला, आरएन श्रीवास्त, आचार्य धर्मेंद्र देव, सुधीर कुमार कक्कड आणि धर्मेंद्र सिंह गुर्जर.


'या' 17 आरोपींचे झाले आहे निधन.

 सीबीआयकडून बनवण्यात आलेल्या 49 आरोपींपैकी अशोक सिंघल, गिरिराज किशोर, विष्णु हरि डालमिया, मोरेश्वर सावें, महंत अवैद्यनाथ, महामंडलेश्वर जगदीश मुनि महाराज, बैकुंठ लाल शर्मा, परमहंस रामचंद्र दास, डॉ . सतीश नागर, बाळासाहेब ठाकरे, तत्कालीन एसएसपी डीबी राय, रमेश प्रताप सिंह, महात्यागी हरगोविंद सिंह, लक्ष्मी नारायण दास, राम नारायण दास आणि विनोद कुमार बंसल यांचे निधन झाले आहे‌.


सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर वेगाने झाली सुनावणी.

 19 एपिल 2017 ला सुप्रीम कोर्टाने सर्व केस स्पेशल कोर्ट, लखनऊ अयोध्या प्रकरण निकाली काढण्याचे निर्देश दिले आणि म्हटले की, 2 वर्षांच्या आत ट्रायल समाप्त करावी. 21 मे 2017 ला स्पेशल सीबीआय कोर्टाने अयोध्या प्रकरणात नियमित सुनावणी सुरू केली. 8 मे 2020 ला सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले की , ही ट्रायल 3 महिन्यात संपली पाहिजे आणि 31 ऑगस्ट 2020 ची तरीख ठरवण्यात आली. परंतु, ट्रायल समाप्त न झाल्याने तसेच लॉकडाऊनचा विचार करता सुप्रीम कोर्टाने 30 सप्टेंबर शेवटची ट्रायल समाप्त करण्याची तारीख ठरवली . 1 सप्टेंबरला दोन्ही पक्षांची सुनावणी पूर्ण झाली आणि 16 सप्टेंबरला स्पेशल जजने 30 सप्टेंबर 2020 ला जजमेंटची तारीख ठरवली होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने