Chandrapur News: जिल्ह्यात नदीत बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू

Bhairav Diwase
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही शहरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. टेकरी गावाजवळील नदीमध्ये दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी, १६ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली असून, परिसरात शोककळा पसरली आहे.


मृत्यू झालेल्या मुलांची नावे:

मृत्यू झालेल्या मुलांची नावे जीत टिकाराम वाकडे (वय १६) आणि आयुष दीपक गोपाले (वय १५) अशी आहेत. दोघेही महालक्ष्मी नगर, सिंदेवाही येथील रहिवासी होते.


पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू:

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सुमारे १० ते १२ मुले नदीत पोहण्यासाठी गेले होते. नदित पोहत असतानाच ही दुर्दैवी घटना घडली. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने जीत आणि आयुष बुडू लागले. त्यांच्यासोबत असलेल्या मित्रांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रयत्न अयशस्वी ठरला.

पोलीस घटनास्थळी:

घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर गोताखोरांच्या मदतीने दोन्ही मुलांचे मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पुढील तपासणीसाठी पाठवले आहेत. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण सिंदेवाही शहरावर शोककळा पसरली आहे.