Anil Dhanorkar: विद्यमान काँग्रेस खासदारांच्या घराला भाजपचा सुरुंग!

Bhairav Diwase

चंद्रपूर:- भाजपमध्ये इनकमिंग सुरूच आहे. भाजपकडे येणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षात वाढली आहे. विशेष म्हणजे आता इतर पक्षातील नेते महायुतीत दाखल होत आहे. शिंदे सेना, अजितदादांची राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढली आहे.


त्यात महाविकास आघाडी आणि विरोधकांना खिंडार पाडण्याचे काम सुरू आहे. विरोधक पुढे नावाला तरी उरतील की नाही, अशी चर्चा रंगली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन महायुतीकडून खास प्लॅनिंग सुरू आहे. आता भाजपने काँग्रेसच नाही तर वंचितला पण दे धक्का दिला आहे. विदर्भातील हा नेता आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.


चंद्रपूर लोकसभेच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांचे भासरे आणि दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचे सख्खे मोठे बंधू अनिल धानोरकर आज भाजपात प्रवेश करणार आहेत. मुंबई येथे आज दुपारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते अनिल धानोरकर यांचा पक्षप्रवेश होणार आहे. अनिल धानोरकर यांच्यासोबत शिवसेना उद्धव सेनेचे 10 नगरसेवक देखील भाजपात प्रवेश करणार आहेत.