Top News

मनपा टीमची मानवटकर व झाडे रुग्णालयाला अकस्मात भेट.

दिल्या जाणाऱ्या सुविधांची केली पाहणी.
Bhairav Diwase. Sep 29, 2020




(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- शहरातील कोरोना आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरातील काही खाजगी रुग्णालयांना कोरोनाबाधित रुग्णांवर उपचाराची परवानगी मा. जिल्हाधिकारी यांनी दिली आहे. या रुग्णालयांद्वारे रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधांची पाहणी आज मनपा प्रशासनाद्वारे अकस्मात भेट देऊन करण्यात आली. शासनाने निर्धारीत केलेल्या मर्यादे व्यतिरिक्त खाजगी रुग्णालये अवाजवी दराने देयके आकारुन रक्कम कोरोना रुग्णांकडून वसूल केली जात असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनाने, खासगी रुग्णालयांमध्ये सरकारी दरानुसारच शुल्क आकारणी केली जात असल्याची खातरजमा योग्य प्रकारे व्हावी, यासाठी महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेतील अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे.




प्रत्येकी 2 अधिकारी याप्रमाणे १७ टीमची नियुक्ती ही खासगी रुग्णालयांसाठी केली आहे. शासनाने निर्धारीत केलेल्या मर्यादेव्यतिरिक्त जर बिल रकमेत तफावत आढळली किंवा रुग्णांकडुन अवाजवी रक्कम घेतली असल्याचे आढळल्यास त्या रुग्णालयावर कारवाई करण्यात येणार आहे. कोरोना बाधित रुग्णांवर खाजगी रुग्णालयात उपचार झाल्यावर रुग्णांची देयके ही महानगरपालिका प्रशासनाने नेमलेल्या ऑडीटरद्वारे प्रमाणीत करून घेतल्याशिवाय अंतिम होणार नसून, प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करणे प्रत्येक खाजगी रुग्णालयाला बंधनकारक आहे. संबंधीत रुग्णालय प्रशासनाने याबाबत कुठलीही कुचराई केल्यास त्यांच्यावर उचित नियम व कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असून रुग्णालयांच्या सेवा सुविधांची पाहणी सुरु राहणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने