पाथरी ग्रामपंचायत अंतर्गत 100% हागणदारी मुक्त गाव फलकावरच.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Oct 21, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) प्रफुल तुम्मे पाथरी, सावली
सावली:- सावली तालुक्यातील पाथरी ग्रामपंचायतिने केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन अभियानाचा बट्ट्याबोळ करीत गरजवंतांना या योजनेपासून वंचित ठेवले आहे . केंद्र सरकारने ग्रामीण भारतात स्वच्छतेकडे भर घालीत पाहिजे त्यांना शौचालय ही योजना राबवली. जेणेकरून ग्रामीण भागात बाहेर शौचास जाण्याला आळा बसून स्वछता राखण्यास व आरोग्याच्या दृष्टीने हिताचे होईल व ग्रामीण जनतेचे आरोग्य व्यवस्थित राहील. परंतु या योजनेचा लाभ पाहिजे त्यांना मिळालेला नाही. 
     पाथरी ग्रामपंचायत अंतर्गत ही योजना राबवित असताना ज्यांच्या कडे शौचालय नाही अश्या गरजू लाभार्थ्याकडे दुर्लक्ष केले आहे. गावात राहत नसलेल्या व्यक्तींना योजनेचा लाभ दिला परंतु गावात असलेल्या व्यक्तींना योजनेपासून वंचित ठेवले. आजही पाथरी येथील जनता बाहेर शौचास जात असल्याचे बघायला मिळत आहे. अनेकदा ग्रामपंचायत यांच्याकडे जनतेने शौचालयांची मागणी करून सुद्धा जनता या लाभापासून वंचित आहे. वास्तविकता या योजनेमध्ये शासनाच्या नियमानुसार लाभार्थी यांनी स्वतः शौचालयांची बांधकाम करायचे असताना सुद्धा स्थानिक प्रशासनाने स्वतःच्या स्वार्थासाठी ठेकेदार पद्धतीने बांधकाम दिले असून बरीच रक्कम ठेकेदार यांच्या नावाने उचल केलेली आहे. ठेकेदार पद्धतीने काम केल्यामुळे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असून वरिष्ठ अधिकारी यांनी सुद्धा कानाडोळा केला आहे. गरज नसताना स्वार्थासाठी एकाच घरात दोन - तीन शौचालय देऊन योजनेचा दुरुपयोग केलेला आहे. काहींच्या घरी तर मुलांचे लग्न सुद्धा झाले नसताना वेगळे कुटुंब दाखवून योजना दिली असून रकमेची उचल केली आहे. काहींच्या घरी शौचालयचं नसताना सुद्धा देयके दिली आहेत. ज्या गरजू लाभार्थ्याला शौचालयांची गरज असताना त्यांना अजूनपर्यंत शौचालयाचा लाभ मिळालेला नाही.. त्या गरजू लाभार्थ्यांना लाभ मिळेल का हे सुद्धा शंकास्पद असून आणि पाथरी येथे बऱ्याच लाभार्थ्याला या योजनेचा लाभ मिळालेला नसताना सुद्धा येथील प्रशासनाने 100% हागणदारी मुक्त गाव कागदोपत्री घोषित करून गावाच्या सुरुवातीलाच फलक लावले आहे. त्यामुळे येथील प्रशासन सरकारी योजना लाभार्थी यांच्या पर्यंत पोहचवीत असेल का याची शंका व्यक्त केली जात आहे.