आ. सुधीर मुनगंटीवार यांनी माळी समाज बांधवांना दिलेला शब्द केला पूर्ण.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्हयातील पोंभुर्णा येथील प्रभाग क्र. 14 मध्ये महात्मा ज्योतीराव फुले सभागृहाचे बांधकाम मंजूर करण्यात आले असून 80 लक्ष रू. किंमतीच्या सदर सभागृहाच्या बांधकामाला लवकरच सुरूवात होणार आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पोंभुर्णा येथील माळी समाज बांधवांना दिलेला शब्द पूर्ण केला आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात पोंभुर्णा येथे माळी समाज बांधवांचा मेळावा संपन्न झाला होता. या मेळाव्यात माळी समाज बांधवांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पोंभुर्णा येथे महात्मा ज्योतीराव फुले सभागृहाचे बांधकाम करण्याबाबत शब्द दिला होता. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात प्रयत्नपूर्वक पाठपुरावा केला. प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत खनिज विकास निधीच्या माध्यमातुन 80 लक्ष रू. किंमतीचे सदर सभागृहाचे बांधकाम आ. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने मंजूर झाले असून यासंदर्भात कार्यारंभ आदेश सुध्दा निर्गमित करण्यात आला आहे.
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आजवर नेहमीच माळी समाज बांधवांनी केलेल्या विविध मागण्यांचा प्रयत्नपूर्वक पाठपुरावा करून मागण्यांची पूर्तता केलेली आहे. दिनांक 5 एप्रिल 2005 रोजी पुण्यातील ज्या भिडेवाडयात सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली त्या भिडेवाडयाला राष्ट्रीय स्मारक म्हणून जतन करण्याबाबत विधानसभेत अर्धा तास चर्चा उपस्थित केली होती व त्यासाठी निधी मंजूर करविला. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले यांचे वंशज त्यांच्या मागण्यांसाठी 2011 मध्ये विधानसभा अधिवेशनादरम्यान नागपूर येथे उपोषणाला बसले होते. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या उपोषण मंडपाला भेट देत त्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्याबाबत वंशजांना आश्वस्त केले होते. त्यानंतर त्यांनी स्थगन प्रस्तावाची सूचना मांडत विधानसभागृहात शासनाचे लक्ष याकडे वेधले. त्यानंतर दिनांक 19 जुलै 2012 रोजी याबाबत अर्धा तास चर्चा त्यांनी उपस्थित केली. या विषयासंदर्भात त्यांनी शासनाकडे सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा केला. संसदीय आयुधांच्या माध्यमातुन विधानसभागृहात ही मागणी रेटली. त्यांच्या वंशजांना शासकीय सेवेत सामावून घेण्यात आले. आ. मुनगंटीवार यांच्या संघर्षाच्या फलस्वरूप महात्मा ज्योतीराव फुले यांच्या वंशजांच्या मागण्यांची पूर्तता झाली.
पुणे विद्यापीठाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे नांव देण्यासाठी आ. मुनगंटीवार यांनी विधानसभेच्या माध्यमातुन संसदीय संघर्ष केला. तारांकित प्रश्न, अर्धा तास चर्चा, कपात सूचना आदी संसदीय आयुधांच्या माध्यमातुन त्यांनी ही मागणी रेटली व त्या माध्यमातुन पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नांव देण्यात आले. बल्लारपूर तालुक्यातील विसापूर या गावात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे आ. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने उभारण्यात आले. मुल येथे माळी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी 45 लक्ष रू. निधी खर्चुन वसतीगृहाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. माळी समाजाचा पोटजातींचा प्रश्न असो वा अन्य मागण्या आ. मुनगंटीवार यांनी सदर मागण्यांचा प्रभावी पाठपुरावा करत मागण्यांची पूर्तता केली आहे. आता पोंभुर्णा येथे 80 लक्ष रू. किंमतीच्या महात्मा ज्योतीराव फुले सभागृहाच्या माध्यमातुन माळी समाज बांधवांची एक नवी महत्वपूर्ण मागणी आ. मुनगंटीवार यांनी पूर्ण केल्याने माळी समाज बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे