राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकांची धडक कारवाई.
चंद्रपूर:- जिल्ह्यात काल राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे धाड टाकून रुपये १ लक्ष २४ हजार ८०० किंमतीचा अवैध दारू साठा जप्त केला. दारुच्या अवैध वाहतुकीवर आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्कचे भरारी पथक नेहमी गस्तीवर असते. या पथकाला प्राप्त झालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी मंगळवारी पहाटे चार वाजता महाकाली मंदिर सुपर मार्केट वॉर्ड चंद्रपूर येथील राजेश दरबारसिंग ठाकुर यांच्या घरी धाड टाकली. यावेळी त्यांचेकडून रुपये १ लक्ष २४ हजार ८०० किमतीच्या रॉकेट देशी दारू ९० मिली क्षमतेचे एकूण ४८ बॉक्स जप्त करण्यात आले. राजेश दरबार सिंग ठाकूर यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (ई) अन्वये कारवाई करून अटक करण्यात आली आहे. यासंबधात पुढील तपास सुरू आहे.