मातृशक्ती सन्मान अभियान २०२० अंतर्गत नवदुर्गा पुरस्कार वितरण.
Bhairav Diwase. Oct 28, 2020
चंद्रपूर:- महाराष्ट्रात कोरोना काळातही महिलांवरील अत्याचार वाढले. आम्ही त्या विरोधात आंदोलन करतो. पण शासन लक्ष देत नाही. मुख्यमंत्री फक्त उपदेश देतात आणि घरी सुरक्षित राहण्याचा सल्ला देतात. भाजपा सोबत सत्तेत असतानाही त्यांची हिच भूमिका होती. भाजपा काळातील योजना बंद करणे हा एकसूत्री कार्यक्रम महाविकास आघाडी सरकारचा आहे. महिलांच्या बचतगटाला संजीवन देणारी भाजपा काळातील उमेद योजना खाजगीकरण व राजकारणासाठी महाविकास आघाडी सरकारने बंद केली. उमेदचे खाजगीकरण भाजपा महिला मोर्चा होऊ देणार नाही. आधुनिक नवदुर्गांनी आता या सरकारला जाब विचारला पाहीजे असे प्रतिपादन प्रदेश भाजपा महिला मोर्चा सरचिटणीस दिपाली मोकाशी यांनी केले.
भारतीय जनता पार्टी, महिला मोर्चा महानगर चंद्रपूर तर्फे बुधवारी येथील बुरडकर सभागृह येथे आयोजित, मातृशक्ती सन्मान अभियान २०२० अंतर्गत नवदुर्गा पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि प अध्यक्ष संध्या गुरनुले या होत्या, तर यावेळी भाजपा महिला मोर्चा उपाध्यक्ष वनिता कानडे, महापौर राखी कंचर्लावार, भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष रेणुका दुधे यांची उपस्थिती होती. दिपाली मोकाशी म्हणाल्या, हे सरकार जनहीताचे सरकार नाही. शेतक-यांना आर्थिक स्वातंत्र्य देणा-या केंद्राच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यास हे तयार नाही. मदतीच्या नावाखाली तुटपुंजी रक्कम देऊन बळीराजाच्या तोंडाला पाने पुसली जात आहे. कोरोनाचा प्रकोप जास्त असताना दारू सुरू केली. पण निव्वळ भाजपाचा विरोध करावा म्हणून प्रार्थनास्थळे बंद ठेवली, या सरकारकडून अपेक्षा करू नका. नवदुर्गांनी आता हा लढा मोठा केला पाहिजे असेही त्या म्हणाल्या. यावेळी डॉ. प्रा.पद्मरेखा धनकर, अॅड. पारोमिता गोस्वामी, उषा बुक्कावार, प्राजक्ता भालेकर, चैताली खटी, अर्चना मानलवार, उषा मेश्राम, डॉ दीप्ती श्रीरामे, प्रमिला बावणे यांचा आधुनिक दुर्गा म्हणून सन्मानपत्र, सन्मानपदक व भेटवस्तू मान्यवरांच्या हस्ते देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी वनिता कानडे, राखी कंचर्लावार यांनी मार्गदर्शन केले. सत्काराला उत्तर देताना अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी विद्यमान पालकमंत्रीचा खरपूस समाचार घेत डॉ कुणाल खेमणार यांच्या समितीचा दारूबंदीवरील अहवाल जगजाहीर करावा अशी मागणी केली. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दारूबंदीसाठी कडक कायद्याचा अध्यादेश काढला, पण या सरकारने पुढे काही केले नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.