Top News

आदिवासी बांधवांच्या घरी उजळणार सुखाच्या दिव्यांची आरास.

नागरिकांनीही या उपक्रमात सहभागी होऊन मदत करावी. गडचिरोली पोलिस विभागांचे आवाहन.
Bhairav Diwase. Oct 28, 2020

गडचिरोली:- भारतीय संस्कृतीत दिवाळी सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. खरेतर दिवाळी म्हणजे प्रकाशोत्सव. पण, अनेकदा गडचिरोलीसारख्या अविकसित, गरिबी आणि नक्षलग्रस्त जिल्ह्यातील आदिवासींच्या घरात या सणालाही अंधार असतो. त्यामुळे आदिवासी बांधवांच्या जीवनातला अंधार दूर करत त्यांच्या घरी सुखाच्या दिव्यांची आरास उजळण्यासाठी गडचिरोली पोलिस विभाग विशेष उपक्रम राबविणार आहे. त्यासाठी इतर नागरिकांनाही मदत करण्याचे आवाहन केले आहे.

दिवाळी सण हा प्रत्येक सधन व गरीब वर्गातील कुटुंब आपापल्या मर्यादेनुसार साजरा करण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु, गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गरीब आदिवासींच्या घरापर्यंत सुखाचा प्रकाश पोहोचत नाही.

आदिवासी जनता अत्यंत हलाखीच्या स्थितीत जीवन जगत असतात. त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी साधे आर्थिक पाठबळही नाही. दिवाळीनिमित्त या समाजास प्रेमाची साद व मायेची फुंकर घालण्यासाठी दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर गडचिरोली पोलिस दल 'यंदाची दिवाळी आदिवासी बांधवांसोबत' हा उपक्रम राबवित आहे. एक माणुसकीचा हात आदिवासी जनतेच्या पाठीशी राहावा या उदात्त हेतूने स्थानिक नागरिक, लहान मुलांसाठी तसेच विद्यार्थी/विद्यार्थिनींसाठी विविध साहित्याची मदत करण्यात येणार आहे.

समाजातील सधन व सहृदही नागरिकांनीसुद्धा या उपक्रमात सहभागी होऊन वंचितांना मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. मदत करू इच्छिणाऱ्या नागरिकांनी साहित्यासाठी रोख रक्कम द्यायची नसून साहित्य स्वतः खरेदी करून द्यावे. पोलिस अधीक्षक कार्यालय, कॉम्प्लेक्‍स एरिया, गडचिरोली या पत्त्यावर हे साहित्य ट्रान्स्पोर्ट करता येईल. मदतीच्या साहित्यावर मदत करणारे त्यांचा लोगो किंवा नाव मुद्रित करू शकतात. हे साहित्य पोलिस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथे जमा करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2020 आहे.

 यासंदर्भात अपर पोलिस अधीक्षक समीर शेख 9718193546, नागरी कृती शाखेचे पोलिस उपनिरीक्षक अतुल खंदारे 9921688508, नियंत्रण कक्ष, गडचिरोली 07132-223149 या क्रमांकावर संपर्क साधता येईल. सर्वांनी या उपक्रमात उत्साहाने सहभागी व्हावे व गरीब, गरजू, वंचितांची दिवाळी प्रकाशमय आणि गोड करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

देता येतील या वस्तू:-

नोटबुक, वह्या, पेन्सिल, इरेझर, शार्पनर, जेवणाचा डबा, दप्तर, कंपास, सोलर लॅम्प, गादी (लहान मुलांसाठी), शर्ट/पॅन्ट पीस, धोतर, लोअर, टी शर्ट, साड्या, पातळ, टॉवेल, फ्रॉक, लॅगीन, बांगड्या, चप्पल, शूज, स्पोर्ट टी शर्ट, पॅन्ट, स्टीलची भांडी, ग्लास, भांडे /पातेले, डबे, मिठाई , सोनपापडी, चिवडा, फरसाण, सामान्य ज्ञान पुस्तके, कथा, कादंबऱ्या, आत्मचरित्रावरील पुस्तके, क्रिकेटचे साहित्य बॅट, बॉल, व्हॉलिबॉल, फुटबॉल, बॅडमिंटन, कॅरम बोर्ड , व्हॉलिबॉल/बॅडमिंटन नेट आदी साहित्याचे मदत करता येणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने