(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- तालुक्यातील विरूर स्टे. वनपरिक्षेत्रातील कविटपेठ येथे मुख्य मार्गावर १७ ऑक्टोबर रोजी मालवण (मांडूळ) सापाची तस्करी करण्यात आली होती. सदर दुर्मिळ जातीचा साप वाहनात टाकून नेताना काही नागरिकांनी बघितले होते. दोन दिवसांचा कालावधी लोटूनही या 'दुर्मिळ' मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्यांचा शोध घेण्यात वन विभागाला यश प्राप्त झाले नाही.
मांडूळ जातीचा साप गुप्तधनाचा शोध घेण्याच्या कामात अत्यंत महत्वाचा मानल्या जातो असा गैरसमज आहे. त्यामुळे गुप्तधन शोधकर्ते सदर सापासाठी लाखो रुपये मोजण्यासाठी तयार असतात.
पांढऱ्या रंगाच्या मालवाहक पिकअप मध्ये मांडूळ साप नेल्याचे नागरिकांनी बघितले. विरुर स्टे. कडून चिंचोली कडे जाणाऱ्या या वाहनातील युवकांनी सापाला पिशवीत टाकले. उपस्थित नागरिकांना वनविभागाच्या हवाली करणार असे सांगून घटनास्थळावरून पसार झाले. याची खात्रीशीर तोंडी माहिती वन अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात आली. सदरचे पिकअप वाहन विरुर स्टे. येथील असल्याचे बोलल्या जात आहे. मात्र या वाहनाचा व तस्करांचा शोध घेण्याचा प्रयत्न वनविभागाने केला नाही. त्यामुळे दोन दिवस लोटूनही तस्करांचा शोध लागला नाही. वन विभागाच्या या उदासीन व सुस्त धोरणामुळे तस्करांना मोकळे रान मिळाल्याची चर्चा नागरिकांत रंगली आहे.