महामहिम राज्यपाल मा. भगतसिंग जी कोशारी यांची भेट घेऊन केली विकास कामांबाबत चर्चा.
Bhairav Diwase. Oct 19, 2020
गडचिरोली:- गडचिरोली जिल्ह्यात केंद्र व राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणावर विकास कामे मंजूर झाली अर्धाअधिक कामे सुरूही झाली मात्र कामे सुरू असताना वनविभागाने नाहरकत परवानगी न दिल्याने तथा पर्यावरण विभागाने रेती घाट सुरू करण्यास परवानगी दिली नाही परिणामी राष्ट्रीय महामार्गासकट दुर्गम भागातील रस्ते, पूल, लघुसिंचन प्रकल्प, दुर्गम भागातील रस्ते, घरकुल व इतर विकास कामे रखडलेली आहेत. याबाबीची दखल घेऊन गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी आज दि 19 ऑक्टोबर रोजी मुंबई येथील राज भवनात राज्याचे महामहिम राज्यपाल मा.श्री भगतसिंग जी कोश्यारी यांची भेट घेतली व जिल्ह्यातील प्रलंबित कामे सुरू करण्यासाठी त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.*
यावेळी खासदार अशोक नेते यांनी महामहिम राज्यपाल याना विविध मागण्यांचे निवेदन दिले व लोकसभा क्षेत्रांतील तथा जिल्ह्यातील रेतीघाट सुरू करण्यासाठी तसेच रखडलेल्या कामांसाठी वनविभागाची परवानगी मिळण्यासाठी राज्य शासनास उचित निर्देश त्वरित देण्याची मागणी रेटून धरली. तसेच गडचिरोली जिल्ह्यात मेडिकल कॉलेज मंजूर होण्याच्या हालचाली केंद्रात सुरू असून याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्र शासनाकडे पाठवायचा आहे मात्र यात दिरंगाई होत असल्याने सदर प्रस्ताव तात्काळ पाठविण्याचे निर्देश आपण राज्य शासनास द्यावे अशी मागणीही खासदार अशोक नेते यांनी राज्यपालांकडे केली.
यावेळी महामहिम राज्यपाल महोदयांनी गडचिरोली जिल्हा हा शेवटच्या टोकावरील जिल्हा असून आदिवासी बहुल, नक्षलग्रस्त व आकांशीत जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्याकडे आपले विशेष लक्ष राहणार असून विकासासाठी जिल्ह्याला विशेष निधी उपलब्ध करून दिला जाईल तसेच रखडलेली विकास कामे व प्रकल्प यथाशिग्र पूर्ण होतील असे आश्वासन राज्यपाल महोदयांनी खासदार अशोक नेते यांना दिले.