दारूबंदी अपयशी की, पालकमंत्री अपयशी, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी वडेट्टीवारांवर केली टीका.

Bhairav Diwase
ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी वडेट्टीवारांवर प्रश्‍नांची सरबत्तीच.
Bhairav Diwase. Oct 21, 2010

गडचिरोली जिल्ह्यात २७ वर्षांपासून तर चंद्रपूर जिल्ह्यात मागील 5 वर्षापासून असलेली दारूबंदी उठविण्यासाठी राज्याचे आपत्ती निवारणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रथम मागणी केली व आता समिती स्थापन करण्याचे प्रयत्न करीत आहेत. मात्र, दारूबंदी अपयशी की, मंत्री अपयशी, असा सवाल करीत ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी वडेट्टीवारांवर प्रश्‍नांची सरबत्तीच केली आहे.


पत्रकात डॉ. बंग यांनी वडेट्टीवार यांना म्हटले आहे की, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी अयशस्वी झाल्याचे तुम्ही म्हणत आहेत. बेकायदेशीर दारू प्रचंड वाढली. विषारी दारू पिऊन खूप माणसे मरत आहेत. दारूबंदी हा शासकीय कायदा आहे.त्याच्या कठोर अंमलबजावणीची जबाबदारी शासनाची म्हणजे पर्यायाने मंत्री म्हणून तुमची आहे.

दारूबंदी अयशस्वी झाल्याची जी वर्णने तुम्ही करता, ती जर खरी असतील तर ते मंत्री म्हणून तुमच्याच अपयशाचे वर्णन आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून व आता-आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असताना शासकीय दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तुम्ही काय प्रयत्न केले? जर शासकीय निर्णयाची तुम्हाला नीट अंमलबजावणी करता येत नसेल तर तुम्ही स्वत:ला 'अपयशी मंत्री' घोषित कराल का?

डॉ. बंग म्हणाले, तुम्ही राज्याचे आपत्ती-सहायता मंत्री आहात. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाची मोठी आपत्ती आली आहे. गावोगावी हजारो माणसे आजारी पडत आहेत. ही भयंकर आपत्ती निवारण्याऐवजी तुम्हाला अचानक दारूबंदी सर्वांत मोठी आपत्ती का वाटते? ती उठवण्यात तुम्हाला एवढा रस का? मुंबईत ड्रग्जचे जाळे पसरले आहे, हे टीव्हीवरून जाहीर होत आहे. महाराष्ट्रात ड्रग्जविरोधी कठोर कायदा आहे. त्याच न्यायाने 'ड्रग्जबंदी अपयशी झाली, तिला उठवा' अशी मागणी तुम्ही केव्हा करणार आहात, असा टोलाही त्यांनी मारला.

राज्यात गुटखाबंदी व सर्व प्रकारची सुगंधित तंबाखूबंदी लागू आहे. तरीही सर्वत्र रस्त्यांवर, चौकांमध्ये, पानठेल्यांवर खुलेआम खर्रा, मावा, सुगंधित तंबाखू विकला जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा सर्वेक्षणानुसार अवैध दारूपेक्षा पाचपट अधिक अवैध तंबाखू विकला जात आहे. ती विक्री थांबविण्यासाठी समिती स्थापन का करीत नाही? अशा प्रश्‍नांची सरबत्तीच डॉ. अभय बंग यांनी मंत्री वडेट्टीवार यांच्यावर केली आहे