पिढ्या-दर- पिढ्यापासून सुरू आहे ही झुंज.
काळजाचा ठोका चुकवणारी रेड्याची झुंज.
Bhairav Diwase. Nov 17, 2020
चंद्रपूर:- शहरातील नंदी समाजाच्या वतीने दरवर्षी पाडव्याच्या निमित्ताने रेड्यांच्या झुंजीचे आयोजन केले जाते. बलीप्रतिपदा म्हणून गायी-बैलांना सजवून त्यांना गोड-धोड खाऊ घालण्याच्या दिवशी रेड्यांचा असा खेळ खेळला जातो. शर्यतींवर लाखोंच्या पैजा लागतात. अवघ्या काही तासात रेड्याचे मालक मालामाल होऊन परतही जातात. यंदाही शहरातील नेहरू नगरलगत असलेल्या आधीच ठरलेल्या जागी मैदानावर सकाळपासूनच गर्दी जमायला सुरुवात झाली. निमित्त होते रेड्यांच्या पारंपरिक शर्यतींचे. या झुंजीवर लाखो रुपयाच्या शर्यती लागत असल्याने या झुंजीचे शौकीन या दिवशी बरोबर नेमक्या परिसरात दाखल होतात.रेड्यांचे मालकही आपापले रेडे उत्तम सजवून मैदानात घेऊन येतात. आणि मग सुरु होतो झुंजीचा खरा थरार. शेकडोंच्या संख्येत लोक या मैदानात जमून या चित्तथरारक झुंजीचे साक्षीदार होतात, तर अनेक शौकीन थेट शर्यतीच्या मैदानात आपले नशीब आजमावतात. रेडे येतात. झुंजले जातात. फायदा-तोट्याचे गणित याच मैदानात सोडून पुढल्या वर्षीचा वादा करत रवाना होतात. या शर्यतीच्या थरारात सहभागी होणारे मात्र हा प्रकार आपल्या पिढ्यांपासून सुरु असल्याचे सांगतात. बघ्यांच्या जीवावर बेतू शकणारा हा खेळ. या खेळात हे रेडे कधीही उलटून गर्दीवर तुटून पडू शकतात. मात्र जीवाची भीती असूनही हा खेळ दरवर्षी खेळला जातो.