चंद्रपूर:- चंद्रपूर पोलिसांचा सायबर गुन्हे शाखा विभाग अतिशय सक्षम समजला जातो. आजवर सायबर गुन्हे शाखेने अनेक क्लिष्ट प्रकरणे उजेडात आणली आहेत, तर शेकडो प्रकरणात आरोपींना जबर शिक्षा झाली आहे. मात्र ताजा गुन्हा चक्क चंद्रपूर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांच्या बाबतीतच घडला आहे.
हेही वाचा:- पद मिळाले, पदवी विसरले.
सायबर गुन्हेगारांनी चंद्रपूरच्या पोलीस अधीक्षकांच्या नावाचे बनावट फेसबुक आयडी तयार केली. त्यांनतर लोकांना त्यावर जोडणे सुरू केले. हळूहळू नंतर या फेसबुक खात्याच्या माध्यमातून नागरिकांना पैशाची मागणी केली गेली असून, त्यासाठी विविध कारणे सुद्धा पुढे केली.
दरम्यान अशाप्रकारे पैशाची मागणी करणारे काही कॉल्स या फेसबुक अकाउंटशी जोडले गेलेल्या नागरिकांना आल्यानंतर त्यांनी खुद्द पोलीस अधीक्षकांना याची माहिती दिली. त्यातून हा प्रकार उजेडात आला आहे.
चंद्रपूर पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने या सायबर गुन्हेगारांविरोधात आता रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, असे बनावट फेसबुक खाते तयार करणाऱ्या आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे.