भारताकडूनही जोरदार प्रत्युत्तरात पाकिस्ताचे 07 सैनिक ठार.
जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रंसंधीचं उल्लंघन करण्यात आलं असून तीन जवान शहीद झाले आहेत. तर तीन जवान जखमी झाले आहेत. याशिवाय तीन नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. गुरेज ते उरी सेक्टरदरम्यान हा गोळीबार केला जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. भारतीय लष्कराकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं जात असून मोठ्या प्रमाणात तोफांचा मारा केला जात असल्याचं वृत्त पीटीआयने दिलं आहे.
पाकिस्तानकडून केरन, उरी, नौगाम सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला. यावेळी नागरी वस्ती असलेल्या ठिकाणांना पाकिस्तानकडून टार्गेट करण्यात आल्याची माहिती भारतीय लष्कराने दिली आहे.
यामध्ये तीन जवान शहीद झाले असून तीन जण जखमी झाले आहेत.
भारताने पाकिस्तानला चोख उत्तर देत असून त्यांचे 07 सैनिक ठार केल्याची माहिती आहे. याशिवाय त्यांचे बंकर उद्ध्वस्त करत मोठं नुकसान केलं आहे. अनेक दहशतवादी तळांनाही यावेळी भारतीय लष्कराकडून टार्गेट करण्यात आलं. दरम्यान स्थानिकांध्ये भीतीचं वातावरण असून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.
याआधी जम्मू काश्मीरमधील कुपवारामध्य्ये इंटरनेट सेवा ठप्प करण्याचा निर्णय घेण्यात आला. भारतीय लष्कराने केरन सेक्टरमध्ये नियंत्रण रेषा ओलांडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न उधळून लावल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनात सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) उपनिरीक्षक शहीद झाले आहेत. राकेश डोवल असं अधिकाऱ्याचं नाव आहे. दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास झालेल्या गोळीबारात ते जखमी झाले होते. त्यांच्या डोक्याला मार लागला होता. उपचारादरम्यान ते शहीद झाले. याशिवाय एक जवान कॉन्स्टेबर वासू राजा जखमी आहे. त्याचा हात आणि तोंड जखमी आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
"कर्तव्य बजावताना अधिकाऱ्याने सर्वोच्च बलिदान दिलं आहे. अधिकारी मूळचे उत्तराखंडचे रहिवासी होते," अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे. दरम्यान अद्यापही शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात असून बीएसएफ त्यांना योग्य उत्तर देत असल्याची माहिती बीएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
:- लोकसत्ता