भद्रावती:- येथील पंचायत समितीचे सभापती तथा कर्नाटक एम्टा कोळसा कंपनीचे प्रकल्पग्रस्त प्रविण नारायण ठेंगणे (३४) यांच्यावर दि.१२ नोव्हेंबर रोजी दुपारी १.३० वाजता दरम्यान चार जनांनी हल्ला करून जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलिसात तकार दाखल करण्यात आली आहे.
सन २०१५ पासून बंद असलेली भद्रावती तालुक्यातील बरांज (मोकासा) येथील कोळसा खदान सुरू करण्या करीता हालचाली सुरू झाल्या असुन प्रकल्प ग्रस्तांचा मात्र याला ठाम विरोध आहे. जो पर्यंत आमच्या मागण्या पुर्ण होत नाही तोपर्यंत खदान सुरू करू नये या मागणीवर ठाम आहेत. या संदर्भात प्रकल्प ग्रस्तांनी दि.१२ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून खाणीतील पाणी काढण्याचे सुरू असलेले काम बंद करण्याचे निर्देश द्यावे अशी मागणी केली. दरम्यान कंपनीचे मारोती चंदनवार, अजय लिहितकर, गौतम सरकार, दिनेश दुबे यांनी खदान परिसरात जावुन काम सुरु केले. याबाबत प्रकल्पग्रस्त प्रविण ठेंगणे, अरविंद देवगडे आणि इतर प्रकल्प ग्रस्तांनी विचारणा केली असता त्यांच्यात बाचाबाची होवुन मारोती चंदनवार आणि अजय लिहितकर यांनी प्रविण ठेंगणे आणि अरविंद देवगडे यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.
या वेळी त्यांच्याकडे असलेल्या चारचाकी वाहनात बदुकी सारखे शस्त्र असल्याचे ठेंगणे यानी पोलिसांत दिलेल्या तकारीत म्हटले आहे. ठेंगणे यांच्या तक्रारीवरून दिनेश दुबे, गौतम सरकार, अजय लिहितकर, मारोती चंदनवार यांच्या विरोधात भा.दं.वि. ३२३, ५०६, कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अजय लिहितकर यांना विचारणा केली असता, आम्ही त्यांना मारहाण केली नाही. उलट त्यांनीच शंभर लोकांसह आमच्यावर हल्ला करून आम्हाला मारहाण केली. त्यामुळे माझा जिवाला धोका असुन मला पोलिस संरक्षण देण्यात यावे. माझ्यावर लावलेले आरोप हे राजकिय षडयंत्र असुन हे कदापिही खपवून घेतल्या जाणार नाही असेही लिहीतकर म्हणाले. दरम्यान,कंपनी तर्फे प्रविण ठेंगणे, राजु डोंगे, दिनेश वानखडे, अरविंद देवगडे यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून त्यांचा विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.