राजुरा पोलीसची डी. बी. बनली चुन्याची डबी.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- राजुरा शहर व परिसरात गेल्या दोन महिन्यापासून सातत्याने चोऱ्या, घरफोड्या होत असून यामुळे सामान्य नागरिकात भीती पसरली आहे. पोलिसांचा धाक नाहीसा झाल्याने व पोलीस विभाग इतर धंद्याकडे जास्त लक्ष देत असल्याने चोरट्यांचे मनोबल वाढले असून ते बिनदास्त आपल्या कार्याला अंजाम देतांना दिसत आहे. पोलीस विभागातील डी.बी. (गुन्हे शोधपथक ) च्या निष्कीयतेमुळे तर सोने, चांदी रुपयांसोबतच आता कुत्र्याचीही चोरी होत असल्याची बाब नुकतीच समोर आली असल्याचे समजते.
राजुरा येथील पोलिसांची डी. बी. केवळ नावापुरतीच उरली असून त्यांचा गुन्हेगारावर वचक उरला नाही त्यामुळे शहरात व परिसरात चोऱ्या, घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. लागोपाठ होण्याऱ्या चोऱ्यामुळे मात्र नागरिकांची झोप उडाली आहे. २४ ऑक्टोबर रोजी स्वप्नपूर्ती कॉलनी परीसरातील सेवानिवृत्त पोस्टमास्तर पोकुलवार यांचे घरी झालेल्या चोरीत सहा ते सात तोळे सोने, चांदी व रोख रक्कम चोरट्यांनी पळविली या घटनेची रिपोर्ट पोलीस स्टेशनमध्ये देऊन आज घडीला १ महिन्याचा कालावधी उलटला परंतु चोऱ्यांचा पत्ता लावण्यास डी. बी. ला यश आले नाही. लगेच नोव्हेंबर महिन्याच्या 29 तारखेला गजबजलेल्या राजीव गांधी चौकात रमेश झंवर याच्याकडे घरफोडी होऊन सुमारे १५ तोळे सोने, चांदी व रोख सात हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला. डी. बी. पोलीसांनी तपासाची खानापूर्ती केली. मदतीला डॉगस्कॉड आणले परंतु 10 दिवस लोटूनही या डी. बी. पथकाला चोरांचा मागमूसही लावता आला नाही. केवळ एक महिन्याच्या अंतराने ही धाडसी चोरी झाली. यापूर्वी मुख्य महामार्गावर दुकाने पान टपऱ्या फुटल्याच्या घटना घडल्या होत्या . परंतु रिपोर्ट देऊनही काहीच निष्पक्ष होत नसल्याने व्यापरांनी तक्रारीच दिल्या नाही. डी. बी. वाल्यांचा ससेमीपयामुळेही छोट्या-छोट्या चोरीच्या रिपोर्ट देण्यास नागरीक मागे पुढे पाहतात ही वस्तुस्थिती आहे.
शहरात भंगार चोऱ्या, पीक पॉकेटींग चैन स्नॅकिंग सारख्या घटना तर सामान्य झाल्या आहेत आता तर कुत्रेही चोरी होण्याच्या घटना घडत आहे. नुकतेच जवाहर नगर वार्डातील एका पत्रकाराच्या घरून डाबरमेन जातीचे कुत्रे चोरीला गेल्याची बाब व्हाट्सअपमधून समोर झाली आहे. सदर कुत्र्याच्या मालकाने याबाबत डी.बी वाल्यांना माहिती दिली असता तुम्ही घरी सी. सी. टी. व्ही. कॅमेरे लावा, दरवाजे मजबूत करुन घ्या व तपास करून आम्हाला कळवा असा सल्ला दिल्याचे कळते. तेव्हा "करायला गेलो काय उलटे झाले पाय" अशी अवस्था तकारकर्त्याची झाली. झकमारली अन पोलीस स्टेशनमध्ये आलो असे त्यांना वाटल्यासारखे झाले व त्यांनी काढता पाय घेतला . राजुरा येथील डी.बी. ही चुन्याची डबी झाल्याची समजते. वसुलीच्या चक्करमधे यांची "खायला फार व भूईला भार" अशी अवस्था झाली आहे. आज घडीला या डी.बी. ( गुन्हे शोध पथक) चा गुन्हेगारावर वचक उरलेला नसल्याने शहरात चोऱ्या, घरफोड्या व इतर स्वरूपाच्या गुन्ह्यात वाढ होतांना दिसत आहे. अशीच परिस्थिती राहील्यास शहरातील घरे रिकामी झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळेच म्हणावेसे वाटते " एस. पी. साहेब काहीतरी करा बरे, नाहीतर रिकामी होतील राजुऱ्यातील घरे".