फिनिक्स तर्फे गोपाल शिरपूरकरांच्या "माह्यी परदेस वारी" चे प्रकाशन व कविसंमेलन.
चंद्रपूर:- साहित्यात उघड ढोंगीपणा आहे. साहित्यातही राजकारण आहे. मातीच्या ढेकुळावर बसून लेखन करतो म्हणून सांगणा-या लेखकांचाही ढोंगीपणा उघड होत आहे. माणसं तोडण्याच्या काळात माणूस जोडण्याचं काम गोपाल शिरपूरकर सकस लेखनातून करत आहेत. ढोंगी साहित्यात शिरपूरकरांचे सच्चे लेखन महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन समीक्षक व साहित्याचे अभ्यासक प्रशांत आर्वे यांनी केले. चंद्रपूरातील प्रसिद्ध लेखक गोपाल शिरपूरकर यांच्या 'माह्यी परदेस वारी' या प्रवासवर्णन पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. चंद्रपूरात पहिल्यांदाच चांगले प्रवासवर्णन प्रकाशित झाल्याचा त्यांनी आनंद व्यक्त केला.
फिनिक्स साहित्य मंचतर्फे पुस्तक प्रकाशन, कविसंमेलन व पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. अध्यक्षस्थानी पोंभुर्णा गटविकास अधिकारी धनंजय साळवे, उद्घाटक प्रशांंत आर्वे तर अतिथी म्हणून कृष्णाजी नागपूरे उपस्थित होते. कोणतीही कलाकृती तेव्हाच मोठी होते, जेव्हा ती जीवनाभिमुख असते. लेखकाचे आपल्या स्वानुभवाशी असलेले सच्चेपण आणि त्याची तादात्म्यवृत्ती हे अद्वैत साहित्यकृतीला मोठे करतात. व-हाडी व झाडीबोलीत लिहिलेले शिरपुरकरांचे प्रवासवर्णन उत्तम आणि आश्वासक आहे, असे मत प्रमुख भाष्यकार समीक्षक डॉ.श्याम मोहरकर यांनी मांडले. अध्यक्षस्थानाहून बोलतांना गटविकास अधिकारी कवी धनंजय साळवे यांनी लेखक अनुभवाशी व भाषेशी प्रामाणिक राहून इतरांना प्रवासासाठी नवी दृष्टी देत असल्याचे मत अधोरेखित करत त्यांचे अभिनंदन केले.
याप्रसंगी फिनिक्स साहित्य मंचातर्फे कवी प्रदिप देशमुख, नंदिनी कन्नाके, राहुल दहिवले यांच्या साहित्यकृतीस फिनिक्स प्रतिभा पुरस्कार तर कार्यकर्ते कवी उमेश पारखी, संगिता धोटे यांना सामाजिक योगदानाबद्दल फिनिक्स सेवाव्रती पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुन्ना गेडाम व मिलेश साकुरकर यांना फिनिक्स कार्यकर्ता पुरस्कार व आदर्श तथा स्मार्ट ग्राम घाटकुळचे ग्रामपरिवर्तक अविनाश पोईनकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात निमंत्रितांचे कविसंमेलन कवी जयवंत वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रविण आडेकर यांच्या उपस्थितीत पार पडले. कविसंमेलनाचे सुत्रसंचालन सुनिल बावने तर पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे कवी नरेशकुमार बोरीकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय वाटेकर, बि.सी. नगराळे, सुरेंद्र इंगळे, सुधाकर कन्नाके, यांनी सहकार्य केले.