मोठ्या बहिणीचा सतर्कतेने लहान बहिणीच्या अपहरणाचा डाव फसला.
ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी येथील पटेल नगर मधील दोन लहान अल्पवयीन शाळकरी बहिणी शिकवणी वर्गाला जात असताना अज्ञात इसमाने लहान मुलीच्या तोंडावर रुमाल लावून बेहोष करत पळवून नेण्याचा प्रयत्न केला. या वेळी मोठ्या मुलीने प्रसंगावधान साधून आरडाओरड केल्याने तो पळून गेला. व अनर्थ टळला. या घटनेमुळे शहरातील पालकांमध्ये मुलींच्या सुरक्षिततेबाबत चिंता निर्माण झाली आहे.
सविस्तर वृत्त असे की, पटेल नगर परिसरात राहत असलेल्या दोन अल्पवयीन मुली 12 डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास दोन सायकलीने शिकवणी वर्गाला जात होत्या. दरम्यान अचानक मोठ्या बहिणीची (अकरा) पुस्तके सायकलवरून खाली पडली. त्यामुळे ती थांबली व लहान बहीण वय (नऊ )आपल्या सायकलने पुढे निघून गेली. दरम्यान त्या ठिकाणी एक अज्ञात इसमानं आला. व त्याने प्रथम पुस्तके उचलणाऱ्या मोठ्या बहिणीला नाव विचारले. ते पुस्तक उचलण्यात व्यस्त असल्यामुळे तो इसम थोड्या दूर अंतरावर उभ्या लहान बहिणी जवळ गेला व बिस्कीट देण्याचा प्रयत्न केला. तिने नकार देतात त्याने खिशातून रुमाल काढला व तिच्या तोंडावर लावली. व तिला बेहोश केले. सदर प्रकार बहिणीच्या लक्षात येताच तिने आरडाओरड करायला सुरुवात केली. मुलीचे ओरडणे एकूण रस्त्याने जाणारा एक इसम मदतीला आला. त्याने लहान बहिणीला बेहोश करण्याऱ्या इसमाला दगड मारला असता तो पळून गेला. मोठ्या बहिणीने सतर्कता बाळगल्याने लहान बहिणी वरील अनर्थ टळला. या घटनेप्रकरणी पीडित मुलीच्या पालकांनी गुरुवारी पोलीस स्टेशन गाठून ब्रह्मपुरी येथे तक्रारीवरून ब्रह्मपुरी पोलिसांनी कलम 363, 511, व कलम 34 अन्यवे विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती फुलेकर करत आहे.