तीन दिवस विजय साजरा; चौथ्या दिवशी पराभव.

Bhairav Diwase
गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधीतील प्रकार.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- ग्रामपंचायत निवडणुकीत आपला विजय झाला असे समजून त्याने तीन दिवस विजयोत्सव साजरा केला. मात्र चौथ्या दिवशी त्याला कळले की आपण तर हरलो आहोत. दुसरीकडे आपण हरलो, असे वाटून दु:खात असणाऱ्या उमेदवाराला विजयाची बातमी कळताच त्याने जल्लोष सुरू केला. ही गमतीदार घटना गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथे घडली. हा संपूर्ण तालुक्यासाठी चर्चेचा विषय ठरला.

ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली. मात्र अद्यापही गावागावातील चौकाचौकात निवडणुकीच्या रंगतदार चर्चा सुरू आहेत. अशात भंगाराम तळोधी येथून आलेल्या बातमीने सुरू असलेल्या चर्चेला चांगलीच फोडणी दिली आहे.

सलग तीन दिवस विजयोत्सव साजरा करणाऱ्या उमेदवाराला गुरुवारी कळले की आपण हरलो आहोत. बिचाऱ्याच्या तोंडचे पाणी पळाले.

झाले असे, गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या भंगाराम तळोधी येथील कमलेश गेडाम हे शेतकरी ग्रामीण विकास आघाडीच्या पॅनलकडून उभे होते. त्यांचे निवडणूक चिन्ह करवत होते. या पॅनलमधील नऊ उमेदवार विजयी झाले असे समजून पॅनलवाल्यानी जल्लोष केला. कमलेश गेडाम यांचे प्रतिस्पर्धी मनोज सिडाम यांनी गेडाम यांचा विजयोत्सव बघून आपला पराभव झाला, असे गृहीत धरून उदास होते. अशातच गुरुवारी गावातील काही तरुण तहसील कार्यालयात गेले. तेव्हा त्यांना माहीत झाले की मनोज सिडाम यांचा विजय झाला आहे. कमलेश गेडाम यांना २१८ मते मिळाली तर मनोज सिडाम याला २३६ मते मिळाली. १८ मतांनी मनोज सिडाम यांचा विजय झाला. विजयाची माहिती मिळताच मनोज सिडाम यांच्या समर्थकांनी जल्लोष केला.