बाईकवरून स्टंट करणं पडलं महागात.
Bhairav Diwase. Jan 27, 2021
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांवर सध्या स्टंट बायकिंगचा उच्छाद पाहायला मिळत आहे. प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारीला हा स्टंट एका नागरिकाच्या जीवावर बेतला. शहरातील मध्यवर्ती बँकेसमोर एका बाईक स्टंट करणाऱ्या युवकाने दुसऱ्या बाईकला धडक दिली. यामध्ये दुसरा बाईक चालक जखमी झाला. त्यानंतर या स्टंट करणाऱ्या युवकाने घटनास्थलावरुन पळ काढला.
नेमकं काय घडलं?
चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख रस्ते आणि महामार्गावर सध्या स्टंट बायकिंग करणाऱ्यांनी उच्छाद मांडला आहे. राष्ट्रीय सणाच्या दिवशी यात अधिक वाढ होते. यंदाच्या 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी मोठ्या संख्येत नागरिकांना या स्टंटबाजीचा उपद्रव सहन करावा लागला.
शहरातील मध्यवर्ती बँके समोर अशाच एका बाईक स्टंट करणाऱ्या युवकाचा स्टंट करताना बाईकवरील ताबा सुटला आणि त्याने अन्य वाहनचालकाला धडक दिली. या धडकेत दुसरा वाहनचालक गंभीर जखमी झाला. मात्र, या जखमी वाहनचालकाला सोडून स्टंट करणारा युवक त्याला सोडून घटनास्थळावरुन पळून गेला.
या घटनेत दुसरा वाहनचालक गंभीर जखमी झाला. त्याला मोठ्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आरोपी बायकरचा स्टंट चित्रित करणाऱ्या सहकाऱ्यांनी ही घटना रेकॉर्ड करत चक्क व्हायरल केली आहे. जखमी अवस्थेतील वाहनचालकाला सोडून स्टंट बायकरने पळ काढतानाची दृश्ये देखील यात रेकॉर्ड झाली आहेत.
पोलीस सध्या फरार असलेल्या आदर्श नन्हेट या स्टंट बायकरच्या शोधात आहेत. पोलीस यंत्रणेने स्टंट बायकिंगवर कठोर निर्बंध आणण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे.