चंद्रपुर:- चंद्रपुरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असून ट्रॅफिकचा प्रश्न चंद्रपुरकरांना सध्या चांगलाच भेडसावत आहे. अश्यातच काल तुकुम-दुर्गापूर रस्त्यावर एका भरधाव जाणाऱ्या डंपरने फळविक्रेत्याला चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली.
या अपघातात फळविक्रेता रवी शेंडे (वय वर्ष ५६) यांचा जागेवरच मृत्यू झाला. काल शुक्रवारी एमएच ३१ सी-०६७२ या क्रमांक असलेली अभि इंजिनिअरिंगची डंपर भरधाव वेगाने दुर्गापूर कडे जात होती. अश्यातच चालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याने जात असलेल्या फळविक्रेत्याच्या वाहनाला चिरडले. या अपघातात फळविक्रेत्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
फळविक्रेत्याला चिरडल्यानंतर वाहनचालकाने वेगाने आपले वाहन थेट दुर्गापूर पोलीस स्टेशन मध्ये उभे केले. कारण अपघात घडल्यानंतर आसपास असलेल्या लोकांनी वाहनाचा पाठलाग करायला सुरवात केली. म्हणून लोकांचा आक्रोश बघून बचाव करण्यासाठी वाहन चालकाने वाहन पोलीस स्टेशन मध्ये लावले. या अपघात प्रकरणी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.