पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांकडून युवकाची हत्या.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Jan 07, 2021
गडचिरोली:- सशस्त्र नक्षल्यांनी ०५ जानेवारीला रात्री भामरागड तालुक्यातील कोठी येथील विनोद मडावी नामक युवकाची तीक्ष्ण शस्त्राने गळा चिरुन हत्या केली. ०५ जानेवारीला रात्री २० ते २५ नक्षली विनोद मडावीच्या घरी गेले. त्यांनी विनोदला झोपेतून उठवून गावाबाहेर नेले आणि हत्या केली. ०६ जानेवारीला सकाळी कोठी टोला गावाजवळच्या रस्त्यावर त्याचा मृतदेह आढळून आला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

 विनोद मडावी हा नक्षल्यांचा टार्गेट होता. त्यामुळे तो कामासाठी तेलंगणा राज्यात गेला होता. महिनाभरापूर्वीच तो तेथून आपल्या गावी आला होता. अशातच ०५ जानेवारीला नक्षल्यांनी त्याची हत्या केली. पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरुन त्याची हत्या केली असावी, असा कयास आहे. नक्षल्यांच्या कंपनी क्रमांक १० च्या सदस्यांनी हे कृत्य केल्याची चर्चा आहे.