पती-पत्नीच्या तीन जोड्या निवडणूक रिंगणात.

Bhairav Diwase
ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळी.....

काँग्रेस पक्षाचा अफलातून प्रयोग.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- राजुरा तालुक्यात २८ ग्राम पंचायतीच्या निवडणुका होत असून ग्राम पंचायतीमध्ये निवडून जाण्यासाठी ग्रामीण क्षेत्रात चढाओढ सुरू आहे. सरपंच पदाचा आरक्षणाचा विषय समोर ढकलल्याने निराश झालेल्या राजकारव्यांनी निवडणुकीत संपूर्ण लक्ष केंद्रित केले असून थंडीतही ग्रामीण क्षेत्रातले राजकारण 'गरम' होत असल्याचे चित्र आहे.
      पाच वर्षांनी येणाऱ्या या निवडणुकीमध्ये काँग्रेस, भाजपा, शेतकरी संघटना, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांसह गावातील हवसे-नवसे देखील मैदानात उतरल्याने ग्रामपंचायत निवडणुकीची रंगत वाढली आहे. सात, नऊ, तेरा अशी सदस्य पदाची संख्या असल्याने कार्यकर्त्यांचा ताळमेळ बसवितांना पुढाऱ्यांची चांगलीच घालमेल होत आहे.
             ग्रामपंचायतीची निवडणूक गावपातळीवरील असली तरी भविष्यातील राजकारण लक्षात घेऊन पुढारी मंडळीही यामध्ये उतरल्याने निवडणुकीत चांगलाच संघर्ष निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
                   काही ठिकाणी भावा विरुद्ध भाऊ एकाच पक्षाचे दोन-दोन उमेदवार उभे ठाकल्याने मते कोणाला द्यावयाची याबाबत मतदारही संभ्रमित आहेत. तालुक्याचा "चिंचोली खुर्द" या ग्रामपंचायत निवडणुकीत तर चक्क तीन पती पत्नीच्या जोड्या निवडणूक मैदानात उतरल्या आहेत.  चिंचोली खुर्द येथील वसंता पढरी ताजने व सौ. निरु वसंता ताजने, केशव विठ्ठल काळे व सौ मनीषा विठ्ठल काळे, नरेश मोतीराम टोंगे व सौ नीता नरेश टोंगे हे तीनही ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य पदाकरिता वेगवेगळ्या वार्डातुन उभे आहेत. केवळ छाया अशोक उरमेथे ही उमेदवार वेगळी आहे. तीन पती पत्नीच्या जोड्या ग्रामपंचायत निवडणुकीत उतरविण्याची किमया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने साधली आहे. कदाचित संपुर्ण महाराष्ट्रातील हा पहिला प्रयोग असण्याचीही शक्यता आहे. या गावात आदिवासी आरक्षण आल्यास सरपंच आदिवासी होईल अन्यथा या तीन जोडयापैकीच कोणीतरी एक सरपंच झाल्याशिवाय राहणार नाही परंतु यासाठी या तीनही जोड्या निवडणुकीत निवडून येणे आवश्यक आहे. १५ तारखेला मतदान असून त्यानंतर मतमोजणी होईल त्यामध्ये यदाकदा या तीनही जोड्यांना मतदारांनी निवडून दिले तर हे महाराष्ट्रातील एक युनिक ठरेल. काँग्रेस पक्ष व त्याच्या पुढाऱ्यांनी चिंचोली खुर्द येथे केलेला अफलातून प्रयोग कितपत यशस्वी होतो याकडे तालुक्यातील सर्वांच्या नजरा चिंचोली खुर्द या गावाकडे लागल्या आहेत.