चार दिवस वेटींग, नंतर केली सेटींग.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- राजुरा येथील अन्न धान्य पुरवठा विभागाच्या आशीर्वादामुळे स्वस्त धान्यांचा मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असून याला पुरवठा विभागातील पॉकेटफेम अधिकारी जबाबदार असल्याचे समजते सरकारी गोदामातून स्वस्त धान्य दुकानदारांना वाटप करण्यात येणारा गहू-तांदुळ बारदाना बदलून खुल्या बाजारात त्याची विक्री केल्या जात असल्याने गरीबांचा घास हिरावल्या जात आहे. सदर गहू तांदुळ जुन्या बस स्टँड परिसरातील एका व्यापाराकडे उतरवला जात असून या व्यापाऱ्याचे काही स्वस्त धान्य दुकानदारांशी साटे- लोटे असल्याची माहिती आहे.
तालुक्यात एकशे आठ स्वस्त धान्य दुकाने असून या दुकानाच्या माध्यमातुन खेडयापाड्यातील गरजू लाभार्थ्यांना धान्य पुरवठा केला जातो. किरायाने घेतलेल्या ट्रकवर हे धान्य लादून ते स्वस्त धान्य दुकानदारांना पुरविण्यात येते धान्याचे इंडेन तयार झाल्यावर गोडावून अधिकारी दुकानदारांना मालाचा पुरवठा करतो. गोडावून मधुन निघालेले अन्न - धान्य सुरक्षितरीत्या पोहचले की नाही हे पाहण्याची जबाबदारी निरीक्षक अधीकारी व अन्न पुरवठा निरिक्षक यांची असते. पुरवठा विभागाच्या नियमाप्रमाणे स्वस्त धान्य कुठेही उतरविता येत नाही व काही कारणास्तव तसे झाल्यास विभागातील अधिकारी किंवा तहसिलदार यांची परवानगी घ्यावी लागते.
राजुरा गोदामातून स्वस्त धान्य घेऊन जाणारे मालवाहू ट्रक स्वस्त धान्य दुकानदाराच्या मालकीचे असून त्यामधूनच स्वस्त धान्याचीवाहतूक केल्या जाते असे दुकानदार अधिकाऱ्यांशी संगनमत करून नेलेले स्वस्त धान्य बारदाना बदलवून परत राजुऱ्याला आणून विकतात व या सरकारी धान्याची खरेदी जुन्या बसस्टँड जवळील धमासठे करतो असे समजते वास्तविक ज्या स्वस्त धान्य दुकानाचा माल आहे त्याने स्वतःच्या मालकीच्या ट्रक किरायाने देने नियमबाह्य आहे. परंतु वरिष्ठांचे आशीर्वाद असल्याने सर्वकाही सुरळीत चालले आहे.
दिनांक २२ डिसेंबर रोजी गुप्त सूचनेवरून देवाडा येथील एक ट्रक रेशनचे ४० ते ४५ कट्टे गहू राजुऱ्याला आणीत असल्याची खबर ट्राफिक पोलिसांना मिळाली. त्यावरून त्यांनी पंचायत समिती चौकात ही ट्रक थांबवून चौकशीसाठी राजुरा पोलीस स्टेशनला लावली तसेच याची माहिती अन्न पुरवठा विभाग राजुरा यांना दिली असता याबाबत चार दिवस वेटिंग ठेऊन हे धान्य सरकारी नाही असा रिपोर्ट अधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशनला दिल्याने नाईलाजास्तव पोलिसांना ट्रक व गहू सोडावा लागला असल्याचे समजते.
सदरचा ट्रक हा एका स्वस्त धान्य दुकानदाराचा असून तो शासकीय धान्य बारदाना बदलून राजुरा येथे विकतो. बारदाना बदलल्याने धान्याचे शासकीय स्वरूप सुद्धा बदलून जाते. या युक्तीचा फायदा घेऊन तो मालामाल होत आहे. मिलीभगत असल्याने अधिकारी सुद्धा हा माल सरकारी नाही असे सांगून हात झटकून मोकळे होत असल्याने गरिबांचे धान्य व्यापाऱ्यांचा घशात जात आहे. तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी जोर धरीत आहे.