🛑आनंद निकेतन च्या प्राध्यापक निलिमा नंदेश्वर यांचे अपघाती निधन.
⭕लग्नाच्या तीनदिवस आधी दुर्दैवी मृत्यू.
🚫10 जानेवारी ला होणार होता विवाह.
वरोरा:- लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचा क्षण, आई वडीलांच्या जीवनातील कर्तव्यपुर्तीचा सोहळा व कन्यादान करून साताजन्मीच्या पुण्याचे फळ मिळण्याचा मंगलमय योग पण विधिलिखित अटळ असते म्हणतात ना, तसाच बाका प्रसंग ओढवला उमरेड येथिल सुखचंद नंदेश्वर ह्यांच्या कुटुंबीयांवर.
प्राध्यापक मुलीचा विवाह विवाह ठरला, निमंत्रण पत्रिका वाटल्या आणि विवाहाला अवघे तीन दिवस उरले असताना येथील आनंद निकेतन कृषी महाविद्यालयात कार्यरत प्राध्यापक तरूणीचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना गुरुवार, 7 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास घडली.
येथील आनंद निकेतन कृषी महाविद्यालयात डॉ. निलीमा नंदेश्वर या सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या. त्या उमरेड येथील रहिवासी होत्या. काही महिन्यापूर्वी त्यांचा विवाह नागपूर येथील डॉ. अश्विन खेमराज टेंभेकर यांच्याशी 10 जानेवारीला निश्चित झाला होता.
वर-वधू पक्षांनी विवाहाच्या निमंत्रण पत्रिका वाटल्या. घरात लग्नाची लगबग सुरू झाली. डॉ. निलीमा विवाहाच्या तयारीकरिता रजेवरही गेल्या. गुरुवारला विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक गुण देण्याकरिता त्या आपल्या आई समवेत चारचाकी वाहनाने वरोड्याकडे येत होत्या. यावेळी डॉ. निलीमा स्वतः वाहन चालवीत होत्या. उमरेडवरून समुद्रपूरमार्गे वरोड्याकडे येत असताना उमरेड-गिरड मार्गावरील पाईकमारी गावाजवळील वळणावर वाहन अनियंत्रित झाले व रस्त्याच्या बाजूला उलटले. यात डॉ. निलीमा आणि त्यांची आई गंभीर जखमी झाल्या. त्यांना हिंगणघाट येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉ. निलीमा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
नियोजित वधूचा अपघातात मृत्यू झाल्याने दोन्ही परिवारात शोककळा पसरली. वधू होऊन सुखी संसाराचे स्वप्न रंगवलेल्या डॉ. निलीमा यांच्या स्वप्नाचा चुराडा झाला. हळद लागण्याच्या तीन दिवसापूर्वी काळाने त्यांच्यावर झडप घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते आहे.