Top News

भद्रावतीत दोन अल्पवयीन मुली बेपत्ता.

ठाणेदारावर कारवाईची रमेश मेश्राम यांची मागणी.

दोन दिवसात कारवाई न झाल्यास आदिवासी समाज उतरणार रस्त्यावर.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- भद्रावती शहरातील दोन अल्पवयीन आदिवासी मुली दि.२ जानेवारीपासून बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्यात भद्रावती पोलिस स्टेशनचे ठाणेदार निष्काळजीपणा करीत असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा आदिवासी समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही,असा इशारा आदिवासी नेते रमेश मेश्राम यांनी पत्रपरिषदेत दिला.

         रमेश मेश्राम यांनी पत्रपरिषदेत सांगितले की, भद्रावती शहरातील शिवाजी नगरातील १६ वर्षीय मुलगी व मोहबाळा येथील १७ वर्षीय मुलगी या दोन्ही शालेय शिक्षण घेणा-या मुली दि.२ जानेवारीपासून बेपत्ता आहेत.त्या बेपत्ता असल्याची तक्रार त्याच दिवशी भद्रावती पोलिस स्टेशनला त्यांच्या पालकांनी दिली. मुली अल्पवयीन असल्यामुळे त्यांच्या पालकांची चिंता वाढलेली आहे. हे प्रकरण संवेदनशील असताना केवळ एका जमादाराकडे तपास देण्यात आला. पोलिसांनी कोणताही तपास किंवा शोध घेण्याकरीता कुठेही पथक पाठविलेले नाही. जर मुलींच्या जीवांचे बरे वाईट झाले, तर त्याला ठाणेदार जबाबदार राहतील. दोन दिवसात कारवाई झाली नाही तर आदिवासी समाज रस्त्यावर उतरेल असा इशाराही रमेश मेश्राम यांनी पत्रपरिषदेत दिला.तसेच अवैध दारु पकडण्यासाठी ए.पी.आय.,पी.एस.आय. या पदावरील अधिकारी पाठविले जातात,मग अल्पवयीन आदिवासी मुलींच्या बेपत्ता प्रकरणाचा तपास केवळ जमादार स्तरावरच्या कर्मचा-याकडे का देण्यात आला ? असा सवालही मेश्राम यांनी पत्रपरिषदेत उपस्थित केला. या संदर्भात वरोरा उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश पांडे यांना दि.४ जानेवारी रोजी एक निवेदन सादर करण्यात आले असून त्याच्या प्रती गृहमंत्री अनिल देशमुख, पालकमंत्री विजय वडेट्टीवार, पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांना पाठविण्यात आल्याचे पत्रपरिषदेत सांगण्यात आले. 

         दीड महिन्यापूर्वी भद्रावती पोलिस ठाण्याअंतर्गत सुमठाना या वस्तीतील एका आदिवासी महिलेवर अत्याचार करण्यात आला. आता या अल्पवयीन मुली बेपत्ता असून त्यांचे अपहरणही झाले असू शकते. अशा घटना आदिवासी समाजाच्या बाबतीत वारंवार घडत असून आदिवासी समाजाचे राजकीय वर्चस्व या क्षेत्रात नसल्यामुळेच पोलिस जाणिवपूर्वक आदिवासी समाजाकडे दुर्लक्ष करत आहेत, असा आरोपही रमेश मेश्राम यांनी शेवटी पत्रपरिषदेतून केला. यासंदर्भात ठाणेदार सुनीलसिंग पवार यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

      पत्रपरिषदेला बेपत्ता मुलींचे आई-वडील, सुनील कुळमेथे, जयेंद्र शेडमाके, सविता कुळमेथे, छबुताई शेडमाके, प्रगती गेडाम,साधना गेडाम, गंगाधर गेडाम, सिद्धार्थ पेटकर, श्रावण वांढरे, विनोद शेडमाके, गोलू गेडाम, भास्कर वरखेडे, शालिक कोटनाके आणि इतर आदिवासी बांधव उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने