Top News

चुकीने दुऱ्याच्या खात्यात जमा झालेली रक्कम अद्याप मिळाली नाही.

बॅंक ऑफ महाराष्ट्र समोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- दीड महिन्यापूर्वी बॅंकेच्या कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे दुसऱ्याच व्यक्तीच्या खात्यात जमा झालेली एक लाख रुपयाची रक्कम अजून पर्यंत परत न मिळाल्याने संतप्त झालेल्या प्रदीप उपाध्याय या हाॅटेल व्यावसायिकाने बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या भद्रावती शाखेसमोर सहपरिवार आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा पत्रपरिषदेत दिला. 
            
      पत्रपरिषदेत प्रदीप उपाध्याय यांनी सांगितले की, आपले वडील अशोक लिलारामजी उपाध्याय (वय ६८ वर्षे) यांचे १९७४ पासून येथील बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये खाते आहे. त्यांनी दि. ७ डिसेंबर रोजी त्यांचे जावई भरत शुक्ला रा.आसपूर जि.डुंगरपूर (राजस्थान ) यांच्या बडोदा बॅंक खात्यात एक लाख रुपये आर.टी.जी.एस. द्वारे जमा केले. चौकशी केली असता ही रक्कम जावई शुक्ला यांच्या खात्यात जमा झालीच नसल्याचे आढळून आले. अधिक चौकशी केली असता सदर रक्कम बिकानेर येथील एका व्यक्तीच्या खात्यात जमा झाल्याचे कळले. ही गोष्ट ऐकून अशोक उपाध्याय यांना जबरदस्त मानसिक धक्का बसला. 
      
      तेव्हापासून ते अजुनही आजारी आहेत. याबाबत त्यांनी संबंधितांना पत्रव्यवहार केला. त्यामुळे बिकानेर येथील 'त्या' व्यक्तिच्या खात्यात जमा झालेली सदर रक्कम 'होल्ड' करण्यात आलेली आहे. परंतू अद्याप परत मिळालेली नाही. आपल्या वडिलांनी चहाची केटली घेऊन बाजारात फिरुन कमाई केलेली आहे. ते आजारी असल्याने त्यांच्या औषधोपचारासाठी पैशाची अत्यंत आवश्यकता आहे. त्यासाठी आपण वारंवार बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या व्यवस्थापकाकडे विनवणी केली. तसेच वकिलामार्फत नोटीसही पाठविली. तरीदेखील बॅंकेने दखल घेतलेली नाही. त्यामुळे ७ दिवसांच्या आत आपल्या वडिलांचे पैसे परत न मिळाल्यास आपण बॅंक ऑफ महाराष्ट्र समोर सहपरिवार आमरण उपोषण करणार असा इशारा प्रदीप उपाध्याय यांनी पत्रपरिषदेत दिला. पत्रपरिषदेला रंजित शिंदे उपस्थित होते.
                
      दरम्यान, यासंदर्भात येथील बॅंक ऑफ महाराष्ट्रचे शाखा व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधला असता आर.टी.जी.एस.चा फार्म भरताना ग्राहकानेच चुकीचा खाते क्रमांक लिहिला. त्यामुळे त्यांची रक्कम चुकीच्या खात्यात जमा झाली. याबाबतीत आम्ही संबंधित बॅंकेला ई-मेल केला असून त्या बॅंकेनी सदर रक्कम होल्ड केली असल्याचे सांगितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने