मुंबई:- पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव आल्यानं शिवसेना नेते संजय राठोड यांना मंत्रिपदापासून दूर जावं लागलं आहे, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे राजीनामा दिला होता, परंतु ४ दिवस उलटले तरी हा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडे पाठवण्यात आला नाही, याबद्दल विरोधकांनी ठाकरे सरकारवर टीका केली होती.
अखेर गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा मंजूर केला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विनंतीनुसार राठोड यांच्या खात्याचा कार्यभार मुख्यमंत्र्यांकडे देण्यास मंजूरी दिली आहे. मुख्यमंत्र्यांकडून आजच दुपारी संजय राठोड यांच्या राजीनाम्याचे पत्र राज्यपालांना प्राप्त झाले होते.