पोंभुर्ण्यात फुलला पळस, रस्त्यांवर पडला सडा.

Bhairav Diwase
0

Bhairav Diwase.    March 29, 2021
पोंभुर्णा:- पळस सध्या चोहीकडे मोठ्या प्रमाणात बहरला आहे. लाल केशरी आणि किंचित पांढऱ्या रंगाच्या फुलांनी बहरलेली पळसाची झाडे सध्या सर्वच ठिकाणी वाटसरूंचे लक्ष वेधून घेत आहेत. होळीचा सण आला की, चोहीकडे नजरेस पडतात ती केसरी रंगाची पळस फुलं. चंद्रपूर जिल्हा हा जंगलव्याप्त असल्यानं इथं अनेक प्रकारची जैवविविधता दिसून येते. पळस त्यापैकीच एक. पळस मोठ्या प्रमाणात इथं आढळतो. पोंभुर्णा-आक्सापुर मार्गावर तर पळस अक्षरशः फुलून आला आहे. 

आज रंगपंचमी. पूर्वी रसायनयुक्त रंग नसायचे. तेव्हा याच फुलांचा नैसर्गिक रंग उधळला जायचा. निसर्गाला आणि शरीरालाही यामुळं कोणती हानी नसायची. पण आता लोकांकडे वेळ नाही आणि रसायनयुक्त रंग अगदी घराजवळ उपलब्ध असल्यानं पळसाच्या फुलांचा रंग तयार करण्याचं प्रमाण प्रचंड कमी झालं.


"पळसाला पाने तीन" अशी म्हण प्रचलित.....

 शिशिराची थंडी ओसरायला लागली, पानगळीने उघडी पडलेली वृक्षराजी नव्या पालवीचे लेणे अंगावर मिरवायला लागली की वसंताची चाहूल लागते. या वसंतात फक्त रंगांची उधळण, रंगोत्सव सुरू होतो निसर्गाचा. शिशिरात बोडक्या झालेल्या शेताला केशरी लाल रंगात न्हाऊ घालणारा पळस नटलेला चोहीकडे पाहण्यास मिळत आहे. झाडाच्या प्रत्येक फांदीवर फुले विस्तवाच्या गोळ्यांसारखी दिसत आहेत. 20 ते 25 फूट उंच असणाऱ्या पळसाला संस्कृतमध्ये पलाश म्हणतात. याचा अर्थ फुलांनी डवरलेले झाड असा होतो. पळसाची फुले श्री सरस्वती आणि कालीमाता या दोन्ही देवींच्या पूजेसाठी भक्तिभावाने वापरली जातात. कुठेही गेले तरी "पळसाला पाने तीन" अशी म्हण प्रचलित आहे. पळसाची पानेही फार उपयोगी आहेत.

पाने गळून गेल्यानंतर पळसाला फुलांचे धुमारे.....

पूर्वी या पानांपासून मोठ्या पंगतीला जेवण देण्यासाठी द्रोण आणि पत्रावळ्या बनविल्या जात. आता काळ बदलला तरी त्याचे महत्त्व कमी झालेले नाही. पळस हा डोंगराळ भागात किंवा शेताच्या बांधावर दिसणारा वृक्ष. त्याची उंची जास्त नसते आणि तो पानगळी वृक्ष आहे, खोड आणि फांद्या वेड्यावाकड्या असतात. तर साल खडबडीत राखाडी रंगाची असते. पाने आकाराने मोठी असतात म्हणूनच त्याचा द्रोण, पत्रावळी बनविण्यासाठी वापर करतात. सर्व पाने गळून गेल्यानंतर पळसाला फुलांचे धुमारे फुटतात. सध्या पळसाची झाडे लाल केशरी, भगवा आणि पिवळ्या अशा रंगांच्या फुलांनी सजलेली दिसत आहेत.

 
धूलिवंदनाला रंग बनविण्यासाठी पळसाच्या फुलांचा वापर.....

 पूर्वी धूलिवंदनाला एकमेकांच्या अंगावर टाकण्यासाठी उपयोगात येणारा रंग बनविण्यासाठी पळसाच्या फुलांचा वापर केला जात असे. आयुर्वेदिक औषधी वनस्पती म्हणूनही याचा वापर होत असे. पळसाची फुले पाण्यात टाकून स्नान केले तर त्वचारोग नाहीसा होतो, असेही आयुर्वेदात म्हटले आहे. पळसाच्या बियांचाही औषधीसाठी वापर केला जातो. अशा बहुगुणी आणि त्यांच्याकडे लक्ष जाताच पाहणाऱ्याच्या डोळ्यांना भुरळ घालणारा पळस सध्या लाल गडद झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)