या ठिकाणी ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून रुग्णांची हेळसांड थांबवा. माजी आमदार अतुल देशकर यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र.
ब्रह्मपुरी:- कोरोनाने ब्रह्मपुरीत थैमान घातले आहे. आता पर्यंत ब्रह्मपुरी शहरात कोरोनाने पाय पसरले होते. आता ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात कोविड रुग्ण आढळत आहेत. अशा परिस्थितीत ब्रह्मपुरी येथे असलेली मुबलक व्यवस्था अपुरी पडत आहे. या बाबी लक्षात घेत ब्रह्मपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांनी गांगलवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारतीला कोविड सेंटर करण्याची मागणी केली आहे.
गांगलवाडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात २ वॉर्ड व २० खोल्या उपलब्ध आहेत. येथे सुसज्ज कोविड सेंटर सुरू झाल्यास ग्रामीण भागातील पोसिटीव्ह रुग्णांचा उपचार होऊन, ब्रह्मपुरी शहरातील आरोग्य व्यवस्था रुळावर येऊ शकते. या गोष्टी लक्षात घेत गांगलवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारतीचा तात्काळ कोविड सेंटर म्हणून उपयोग करा, असे माजी आमदार अतुल देशकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात म्हंटले आहे.
२३ ऑक्टोबर २०१७ रोजी या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन तत्कालीन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते करण्यात आले होते. २०२० मध्ये या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले परंतु अजूनही या ठिकाणी रुग्णांसाठी प्राथमिक आरोग्य व्यवस्था केली जात नाही. २ वॉर्ड २० खोल्या असलेल्या या सुसज्ज इमारतीचा उपयोग शासन प्रशासन का करीत नाही असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
गांगलवाडी येथे कोविड सेंटर सुरू झाल्यास ग्रामीण भागातील बाधित रुग्णांना योग्य उपचार मिलणार आहे.