अकार्यक्षम पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी राजीनामा द्यावा:-माजी आमदार अतुल देशकर.

Bhairav Diwase
ब्रम्हपुरी येथे जंबो कोविड सेंटर उभारण्याची केली मागणी.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
ब्रम्हपुरी:- चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा मतदारसंघ असलेल्या ब्रम्हपुरीत आज वैद्यकीय उपचाराच्या अभावी एका 50 वर्षाच्या इसमाचा कोरोनाने मृत्यू झाला. स्वतःचा मतदारसंघ ज्या मंत्र्याला सांभाळता येत नाही तो जिल्हा आणि राज्य काय सांभाळणार? असा प्रश्न जनतेकडून उपस्थित केला जात आहे.
ब्रह्मपुरी मतदारसंघात दारु, अवैध वाळू उपसा, आणि इतर अवैध धंदे सुरू ठेवायला पालकमंत्री वडेट्टीवारांकडे वेळ आहे. मात्र कोरोनाच्या महामारीत स्वतःच्या मतदारसंघातच आरोग्य व्यवस्था उभी करायला वेळ नाही. ब्रह्मपुरी आणि चंद्रपूर जिल्ह्यातील जनते प्रति तुम्हाला जरा जरी प्रेम, सहानुभूती असेल तर तात्काळ स्वतःच्या मंत्री पदाचा आणि आमदारकीचा राजीनामा द्या असे माजी आमदार अतुल देशकर यांनी माध्यमांसोबत बोलतांना म्हंटले आहे.

पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे मुंबईची लोकल सुरू करायची की बंद करायची या बाबत बोलतात. परंतु स्वतःच्या जिल्ह्यात, मतदारसंघात त्यांचे पूर्णतः दुर्लक्ष असल्याचे माजी आमदार अतुल देशकर म्हणाले.

जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर हे जिल्ह्याला रेमडीसीवर इंजेक्शन्स, प्राणवायू सिलेंडर, अतिरिक्त बेड मिळावे याकरिता प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. परंतु पालकमंत्री कोणत्याच बाबीकडे लक्ष देत नाही. ब्रम्हपुरीची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ब्रम्हपुरी येथे जंबो कोविड सेंटर उभारण्याची मागणीही माजी आमदार अतुल देशकर यांनी केली.