💻

💻

कोरोना पळवण्यासाठी ग्रामीण भागात अंधश्रद्धेचा अघोरी खेळ.


Bhairav Diwase. May 12, 2021
चंद्रपुर:- एकीकडे कोरोना संसर्ग दूर करण्यासाठी जगभरात लसीकरण मोहीम अधिक गतीने राबवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर, त्याचवेळी कोरोना निर्मूलनासाठी पूर्व विदर्भातील ग्रामीण भागांमध्ये अंधश्रद्धेचा अघोरी खेळ खेळला जात आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे, चंद्रपूर जिल्ह्यातील काही गावांमध्ये बकऱ्याचा बळी देत त्याचे रक्त गावाच्या सीमेवर शिंपडून गावात कोरोनाचा प्रवेश रोखण्याचा अजब प्रयत्न करण्यात आला.
गावात आठवडाभरापासून बहुतांश लोकांना ताप आला असल्याने हा दैवी प्रकोपच असावा, या समजापोटी गावकऱ्यांनी देवीला साकडे घालण्याचे ठरवले. या परिसरातील गावखेड्यात संकटकाळात माऊलीला (देवी) पाणी घालण्याची प्रथा आहे. त्यानुसार गावातील महिलांनी नदीवरून कळशीत पाणी भरून वाजतगाजत आणून माऊलीला पाणी अर्पण केले. दोन, पाच, किंवा सात दिवस माऊलीला पाणी अर्पण केले म्हणजे ताप जातो, अशी या लोकांची समजूत आहे.
पूर्व विदर्भातील अनेक गावांमधील लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता करोनाला पळवण्यासाठी चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मंदिरात हवन, पूजन, आरती, देवीला नवस, पाणी वाहणे असे प्रकार केले जात आहेत, तर काही ठिकाणी कोरोनाला संतुष्ट करण्यासाठी बकरी आणि कोंबड्यांचा बळी दिला जात आहे.
या क्रमात चंद्रपूर जिल्ह्यात काही गावांनी लोकवर्गणी करून बकऱ्यांचा बळी देण्याचा निर्णय घेतला. मांत्रिकाच्या सल्ल्यानुसार बळी दिलेल्या बकऱ्याचे रक्त गावाच्या सीमांवर शिंपडण्यात आले. ही बाब काही शिक्षित युवकांना कळताच त्यांनी या अघोरी प्रकाराला विरोध केला. याविरोधात तक्रार करण्याचा इशारा देताच ग्रामसेवकांनी पुढाकार घेत हा प्रकार रोखला. नंतर याच सुज्ञ युवकांनी संपूर्ण गावात निर्जंतुकीकरण करण्यासाठी पुढाकार घेतला. चंद्रपूर जिल्ह्यातील एका गावात हा प्रकार रोखण्यात आला असला तरी अन्य भागांमध्ये मात्र असा प्रकार सुरूच आहे.
महिलांचा मोठा सहभाग......

गावातील देवीला पहाटे पाणी वाहिले की करोना पळतो म्हणून लोक लसीकरण सोडून देवीच्या मंदिरांमध्ये रांगा लावत आहेत. काही वाजंत्रीच्या सोबतीने मिरवणूक काढून हा प्रकार केला जात आहे. यात महिलांचा मोठा सहभाग आहे.
कोरोना अंधश्रद्धेने नाही तर लसीकरणानेच टाळता येणार......

अंधश्रद्धेपुढे आरोग्य विभागाचे पथकही हतबल झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात असाच प्रकार पाहावयास आणि ऐकाला मिळत आहे. गावातील लोक अंधश्रद्धा पाळत असुन आरोग्य विभागाला एक प्रकारचा ठेंगा दाखवला जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झाला असून तापाची साथ सुरु आहे. काही लोक तपासणी ला सामोर जात नसल्याने गावात कोरानाचे रुग्ण संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गावात सकाळच्या सुमारास वाजत-गाजत एक प्रकारची मिरवणूक काढली जाते. व माऊलीला पाणी अर्पण केले जात आहे. यांच्याकडे जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन व आरोग्य विभागानी गावात सकाळच्या सुमारास फेरफटका मारून नेमका हा प्रकार काय? यांच्या कडे लक्ष देण्याची गरज आहे. अंधश्रद्धेला बळी न पडता तपासणीला समोर जावे. असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.‌ हा फार वाईट प्रकार आहे. हे सगळे करण्यापेक्षा लोकांनी लस घ्यायला हवी. नागरिकांच्या भावना शुद्ध असल्या तरी कोरोना अंधश्रद्धेने नाही तर लसीकरणानेच टाळता येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत