कोरोनाने हिरावला पती, तरीही रुग्णांच्या नातेवाइकांसाठी त्या बनल्या "ज्योती"

Bhairav Diwase

गडचिरोली:- ज्याेती जयराम मेश्राम, रा. काेटगल असे त्या महिलेचे नाव आहे. जिल्हा मुख्यालयाच्या कुशीत असलेल्या कोटगल येथील त्या रहिवासी. मेश्राम कुटुंब हे पंचक्रोशीत बऱ्यापैकी सुपरिचित आहे. दरम्यानच्या काळात ज्योती मेश्राम यांची 'झाशी' म्हणूनच ओळख होती. त्याच मेश्राम कुटुंबातील जयराम मेश्राम हे ज्योतीताईंच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. संसारात रममाण होण्याच्या काळात जयराम मेश्राम यांनी एक जबाबदार व्यक्ती म्हणून दोन अपत्यांनंतर पत्नी ज्योतीला पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले. अशा कर्तृत्ववान व्यक्तीचे नुकतेच कोरोनाने निधन झाले. मेश्राम कुटुंबावर माेठे संकट काेसळले. त्यांना समाेर अनेक अडचणी दिसू लागल्या.
याच स्थितीत कुटुंबाला सावरण्यासाठी त्यांनी युवक काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना हाक दिली. ज्याेती यांनी दिलेल्या हाकेला युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे व पदाधिकारी धावून आले. संकटकाळात आपल्याला ज्या लाेकांनी मदत केली, त्यांनाही आपण सहकार्य करावे, या भावनेतून ज्याेतीताई यांनी युवक काॅंग्रेसने रुग्णालय परिसरात सुरू केलेल्या भोजन वितरण उपक्रमात सहभागी हाेण्याचे ठरविले. दु:खातून सावरत नाही, तोच सामाजिक भान लक्षात घेऊन व कोरोना काळात कुटुंबावर काय परिस्थिती उद्भवते याची जाणीव ठेवून ज्योतीताईंनी थेट युवक काँग्रेसच्या भोजन वितरण उपक्रमात सहभाग घेतला.
मुलगी व जावयांचेही सहकार्य....

कुटुंबात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर काही दिवस समाज कुटुंबाकडे कसा बघताे, याची कल्पना न केलेलीच बरी. त्यातही एखादा सदस्य काेराेनाने दगावला तर लाेक संपर्कही कमी करतात. याचा स्वानुभव आल्यानंतर, एकाकी लढा देण्याचा अनुभव पाठीशी असलेल्या ज्योतीताई या विवाहित मुलगी कल्याणी व जावई अल्केश बनसोड यांना सोबत घेऊन थेट काेराेना रुग्णांच्या नातेवाइकांच्या सेवेत दाखल झाल्या. नातेवाइकांना भाेजनदानाचे काम त्यांनी सुरू केले. यावेळी त्यांनी दाखविलेली हिंमत व धैर्य कोरोनाशी लढा देत असलेले रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांना प्रेरणादायी ठरणारे आहे.