Top News

......अन् त्यांनी स्वतःच्या कारने नेऊन दिला मृतदेह.


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
अहेरी:- सध्याच्या कोरोनाकाळामुळे कोणी कोणाच्या जवळ जाण्यास तयार नाही, तिथे कोणाच्या मदतीसाठी धावून जाणे तर दूरच राहिले. पण, अशाही वातावरणात अहेरीच्या एका दुर्धर आजाराने ग्रस्त व्यक्तीने एका नवजात अर्भकाचा मृतदेह त्या कुटुंबाच्या गावी आपल्या कारमधून पोहोचवून संवेदनशिलतेचा परिचय दिला आहे.
प्राप्त माहितीनुसार, एटापल्ली तालुक्यातील पुरसलगोंदी येथील एका आदिवासी महिलेला प्रसुतीकळा सुरू झाल्या. त्यामुळे तिला अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयाचे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अनंत जाधव यांनी महिलेची तपासणी केली. त्यावेळी गर्भात असणाऱ्या बाळाचे ठोके जाणवत नव्हते. त्यानंतर प्रसुतीकळा सुरू असताना थोड्या वेळात महिलेची प्रसुली झाली. पण, महिलेने जन्म दिलेले बाळ मृतावस्थेत होते.
मृत बाळ जन्मल्याच्या दु:खातून स्वत:ला सावरत त्या महिलेच्या कुटुंबीयांनी बाळाला आपल्या स्वगावी नेण्याची तयारी दर्शविली. मात्र, लॉकडाऊनच्या काळात वाहनाची व्यवस्था कशी करावी, हा मोठा प्रश्न त्या आदिवासी कुटुंबासमोर निर्माण झाला. ही बाब अहेरी येथील राजे धर्मराव कृषी विद्यालयात कार्यरत असलेले संजय झिलकलवार, सुमित मोतकुरवार आणि तिरुपती बोम्मनवार यांना माहीत झाली. झिलकलवार यांनी मागचापुढचा विचार न करता आपल्या कारने त्या मृत नवजात अर्भकासह कुटुंबीयांना एटापल्ली तालुक्यातील पुरसलगोंदी येथे सोडले. त्या आदिवासी महिलेची प्रकृती आता ठीक असून, तिच्यावर अहेरी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
स्वत: दुर्धर आजाराने ग्रस्त, तरीही मदतीसाठी धावले...

विशेष म्हणजे संजीव झिलकलवार हे दुर्धर आजाराने ग्रस्त आहेत. दोन महिन्यांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. तेव्हापासून ते फक्त दूध किंवा द्रव पदार्थांवरच आपले पोट भरत आहेत. अशा परिस्थितीतही स्वखर्चाने त्यांनी मृत नवजात अर्भकास स्वगावी सोडून दिले. परिस्थितीचा फायदा घेत अनेक जण मृतदेह नेण्यासाठी जादा दर आकारतात. अनेकांचे नातेवाईकही पुढे येत नाहीत. झिलकलवार यांनी आदिवासी कुटुंबाला आत्मियतेने मदत करत समाजासमोर आदर्श ठेवला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने