Top News

गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात मृतदेहाची अदलाबदल.



(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गडचिरोली:- गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एका वृद्धाचा मृतदेह दुसर्‍याच रुग्‍णाच्‍या नातेवाईकांना सुपूर्द केल्याने खळबळ उडाली आहे. याबाब मृत रुग्‍णाच्या नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
गडचिरोलीनजीकच्या विसापूर येथील राघोबा भोयर(६८) यांचा २४ मेच्या पहाटे जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झाला. त्‍यांचे नातेवाईक मृतदेह घेण्यासाठी रुग्‍णालायात आले. संबंधित कर्मचार्‍यांनी त्यांना एक मृतदेह सुपूर्द केला.
राघोबा भोयर यांच्याऐवजी भलत्याच व्यक्तीचा मृतदेह असल्याचे नातेवाईकांच्‍या लक्षात आले. त्यांनी ही बाब रुग्णालयातील अधिकार्‍यांना सांगितल्यानंतर खळबळ माजली.
काही वेळानंतर, सकाळीच एक मृतदेह सिरोंचा येथे नेण्यात आल्याचे सांगण्यात आले. लागलीच कर्मचाऱ्यांनी सिरोंचा येथील मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना फोन करुन 'तुम्ही दुसऱ्या व्यक्तीचा मृतदेह घेऊन गेले, गडचिरोलीला परत या', असे सांगितले. तोपर्यंत ही मंडळी शंभर किलोमीटरवरील आलापल्ली गावी पोहचले होते. ते गडचिरोलीला परत आले आणि राघोबा भोयर यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना सुपूर्द केला. जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेल्या या घटनेबद्दल नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने