भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'! महापौर पदासाठी संगीता खांडेकर, तर उपमहापौर पदासाठी संजय कंचर्लावार यांच्या नावावर शिक्कामोर्तब!

Bhairav Diwase
चंद्रपूर:-
चंद्रपूर महानगरपालिकेच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. एकीकडे महापौर आणि गटनेता पदावरून काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असताना, भारतीय जनता पक्षाने मात्र आपला 'प्लान रेडी' केला आहे. मुंबईत पार पडलेल्या भाजपच्या महत्त्वपूर्ण बैठकीत महापौर आणि उपमहापौर पदाचे उमेदवार अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहेत.

आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्यातील समन्वयाची चर्चा आता शहरात रंगू लागली आहे. बैठकीतील ठरावानुसार, महापौर पदासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या कट्टर समर्थक सौ. संगीता खांडेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. यामुळे चंद्रपूरचे महापौर पद आता मुनगंटीवार गटाकडे जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


दुसरीकडे, आमदार किशोर जोरगेवार यांच्या समर्थकांनाही सत्तेत योग्य वाटा देण्यात आला आहे. जोरगेवार समर्थक संजय कंचर्लावार यांना उपमहापौर पदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. मुनगंटीवार यांना महापौर पद आणि जोरगेवार यांना उपमहापौर पद, अशा या सत्तावाटपामुळे भाजपमधील संभाव्य वाद टाळण्यात वरिष्ठ नेत्यांना यश आले आहे.

विशेष म्हणजे, काँग्रेसमध्ये अजूनही महापौर पदाच्या नावावरून एकमत झालेले नाही. अंतर्गत वादामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढलेली असताना भाजपच्या या वेगवान हालचालींनी विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. आता या चुरशीच्या लढतीत चंद्रपूरचा 'गड' कोण राखणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.