चंद्रपूर:- सध्याच्या धावपळीच्या आणि बदलत्या राजकीय वातावरणात, सत्तेसाठीची चढाओढ आपण रोजच पाहतोय. पण हीच परिस्थिती जेव्हा पडद्यावर वास्तववादी पद्धतीने मांडली जाते, तेव्हा ती प्रेक्षकांच्या काळजाला भिडते. चंद्रपूरचे दिग्दर्शक देवा बुरडकर यांचा ‘किस्सा टिकिट का’ हा लघुपट सध्या असाच चर्चेचा विषय ठरत आहे.
निवडणूक म्हटली की गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चा रंगते ती 'तिकीट' कोणाला मिळणार याची! राजकारणातील हीच अंतर्गत धुसफूस, तिकीट मिळवण्यासाठी होणारी धडपड आणि यात सामान्य माणसाची होणारी होरपळ, याचा जिवंत अनुभव म्हणजे ‘किस्सा टिकिट का’. दिग्दर्शक देवा बुरडकर यांनी अतिशय प्रभावी संवादांच्या माध्यमातून समाजातील विदारक वास्तव मांडले आहे.
या शॉर्ट फिल्मची मांडणी इतकी वास्तववादी आहे की, प्रेक्षक स्वतःला या कथेशी जोडून घेत आहेत. स्थानिक कलाकार आणि नैसर्गिक लोकेशन्समुळे या चित्रपटाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली आहे. युट्युबवर या लघुपटावर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे.
या यशाबद्दल बोलताना दिग्दर्शक देवा बुरडकर म्हणतात की, समाजात जे घडतंय तेच आम्ही प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न केला आणि प्रेक्षकांनी त्याला दिलेली दाद हीच आमच्या मेहनतीची पोचपावती आहे. राजकारणातील चिखलफेक आणि सत्तेचा संघर्ष मांडणारी ही कलाकृती आगामी काळात अधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल, यात शंका नाही.

